तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी ‘शक्ती अलायन्स’ उपक्रम सुरू:बीएनवाय आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वूमन यांचा संयुक्त पुढाकार




तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांना सक्षम करून भविष्यातील महिला तंत्रज्ञान नेतृत्वाची नवी पिढी घडवण्यासाठी बीएनवाय आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वूमन (सीसीओईडब्ल्यू) यांनी ‘शक्ती अलायन्स’ हा बहुवार्षिक उपक्रम सुरू केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अभियांत्रिकी शिक्षणातील गुंतवणुकीच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानासाठी आवश्यक कौशल्ये आणि प्रत्यक्ष अनुभव देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत अनुभवाधारित शिक्षण, उपयोजित संशोधन, अभ्यासक्रम संवर्धन आणि प्राध्यापक विकास या चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. बीएनवायची जागतिक अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञता आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापरातील अनुभव, तसेच कमिन्स कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता यांचा या सहयोगातून समन्वय साधला जाणार आहे. विद्यार्थिनींना प्रकल्प, मार्गदर्शन आणि उद्योगातील तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, उत्पादन विकास आणि आधुनिक कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. तसेच उद्योगांसाठी उपयुक्त एआय आधारित तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने संशोधन आणि नवोपक्रमाच्या संधींचा शोध घेतला जाणार आहे. अभ्यासक्रमात सुधारणा, कॅपस्टोन प्रकल्प आणि उद्योगांच्या सहभागातून विद्यार्थिनींची व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावरही भर दिला जाईल. प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण, ज्ञानाची देवाणघेवाण आणि बीएनवायच्या तज्ज्ञांशी संवादाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे आधुनिक अभियांत्रिकी पद्धती आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शैक्षणिक प्रक्रियेत समावेश करण्यास मदत होईल. बीएनवायच्या चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर आणि ग्लोबल हेड ऑफ इंजिनिअरिंग ली-अॅन रसेल यांनी सांगितले की, एआयमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांचे स्वरूप बदलत आहे. या उपक्रमातून विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि भविष्यात नेतृत्वाच्या संधींसाठी त्या तयार होतील. कमिन्स कॉलेजच्या प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे यांनी हा सहयोग दोन्ही संस्थांमधील संबंधांचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे महिला अभियंत्यांमध्ये नवकल्पना, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *