![]()
सातारा जिल्हा परिषदेत निवडणूक निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुती अंतर्गत घटक पक्षात झालेल्या या निवडणुकीत जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यापासून भाजपला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाने रोखले आहे. भाजपने २६ जागा मिळवत सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने २२, शिवसेना शिंदे पक्षाने १५, काँग्रेसने एक आणि अपक्ष एक असे जिल्हा परिषदेचे पक्षीय बलाबल राहिले. त्यामुळे आता सत्ता कोणाकडे जाणार की महायुतीची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या सहानभूतीचाही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला काही प्रमाणात फायदा झाला. त्यामुळे त्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीतील जागा वाढल्या. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार व दोन मंत्री असल्याने जिल्हा परिषद जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येणार हे निश्चित होते. मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपाला सत्तेपासून रोखण्यात यश मिळविले. अतिशय काटेकोर नियोजन आणि चिवटपणे प्रचार करून या पक्षाने २१ जागी विजय मिळवला. शिवसेना शिंदे पक्षानेही १५ जागा जिंकल्या. छोटी (मिनी) विधानसभा म्हणून ओळख असणाऱ्या या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी मतदार संघातील सर्वाधिक जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला. त्यांचे चुलत बंधू अरुण गोरे आणि त्यांच्या वहिनी भारती अंकुश गोरे हे पराभूत झाले. तर जयकुमार गोरेंच्या दुसऱ्या वहिनी सोनल शेखर गोरे या विजयी झाल्या.जिल्हा परिषद तीन राष्ट्रवादी दोन जागा जिंकल्या तर पाच पंचायत समितीच्या पाच जागा जिंकून जयकुमार गोरे यांचा वारू रोखला. मागील चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुदगे यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीने कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनाही धक्का बसला. पाटण मध्ये भाजपाचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या २२ वर्षाच्या मृणाल महेश पाटील यांनी त्यांचा पराभव केला. मृणाल पाटील या सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत. पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपले मतदारसंघांमध्ये वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीने विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचा मागील पराभवानंतर फलटणमध्ये पुनर्जन्म झाला आहे. त्यांच्या शिवसेना शिंदे पक्षाच्या पाच जागा निवडून आल्या आहेत. वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघात मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. मतदारसंघातील नऊ पैकी सहा जागा त्यांनी जिंकले आहेत त्याचबरोबर वाई खंडाळा महाबळेश्वर पंचायत समितीची सत्ता ही त्यांनी मिळवली आहे. या निवडणुकीत कोरेगाव खटाव शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघातील दोन सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. एकूणच या निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात पैशाच्या बाळाचा वापर पक्षांकडून झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील सर्व भागात तालुक्यात व विधानसभा मतदारसंघात आपली ताकद असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती मात्र त्यांना सहा जागी पराभव पत्करावा लागला. सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागी भाजपा आणि दोन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.कोरेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी तीन, शिवसेना दोन, भाजप एक जागा जिंकल्या आहे. माण तालुक्यात राष्ट्रवादीने तीन आणि भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत. खटाव तालुक्यात भाजपने चार, आणि राष्ट्रवादीने तीन जागा जिंकल्या आहेत. जावळी येथे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. फलटण येथे शिवसेनेने पाच, भाजपा दोन आणि राष्ट्रवादीने एक जागा घेतली आहे. पाटण येथे शिवसेना सहा आणि भाजपाने एक जिल्हा परिषद गट जिंकला आहे. वाई खंडाळा आणि महाबळेश्वर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने सहा, शिवसेना एक आणि भाजपाने दोन जागा मिळविल्या आहेत. या निवडणुकीत औंध (ता खटाव) गटातून गोरे यांच्या वहिनी भाजपच्या भारती अंकुश गोरे यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे विजयी आले आहेत. कुकुडवाड(ता माण)गटातून भाजपाचे अरुण गोरे यांचा पराभव झाला असून सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई यांचा विजय झाला. मायणी जिल्हापरिषद गटाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड सुरज शिवाजीराव पाटील, यांचा दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांसह विजयी झाले. मार्डी या जिल्हा परिषद गटात सख्या जावा निवडणूक लढवत होत्या. यामध्ये भाजपच्या भारती पोळ यांचा पराभव राष्ट्रवादीच्या सोनाली पोळ विजयी झाल्या झाल्या आहेत. सातारा खेड गटातुन राष्ट्रवादीचे कामेश कांबळे, कोडोली गटातुन भाजपच्या नीता खरात, कारी गटातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकारी भाजपचे राजुभैय्या भोसले, वर्णे गटात राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राजु शेळके कोरेगाव कुमठे जिल्हा परिषद गट राजाभाऊ जगदाळे, पाटखळं गटातून राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव, लिंब गटातुन भाजपचे सर्जेराव सावंत, महाबळेश्वर तळदेव गटातून शिवसेनेचे अजय सपकाळ, वाईच्या ओझर्डे गटातून वृषाली चव्हाण, यशवंत नगर गटा तून दिनकर शिंदे, बावधन बावधन राष्ट्रवादीच्या गटातून ऋतुजा विराज शिंदे, भुईंज गटातून दिलीप बाबर भाजपचे विजयी झाले आहेत. याबरोबरच मदन भोसले यांच्या कन्या सुरभी भोसले भुईंज पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निल गायकवाड भाजपाच्या चिन्हावर पंचायत समिती पसरणी गणातून विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी कुमठे गण स्वाती जाधव राष्ट्रवादी, ल्हासुर्णे गण रुपाली शिवाजी गुरव राष्ट्रवादी विजयी. एकंबे गटात राष्ट्रवादीच्या राजेश्वरी भोसले विजयी. वाई तालुक्यात जि.प. चार पैकी तीन व पंचायत समिती आठ पैकी पाच जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्या आहेत.खंडाळा तालुक्यात जि.प. तीन पैकी दोन व पंचायत समिती सहा पैकी चार जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यात जि.प च्या दोन पैकी एक राष्ट्रवादी व एक शिवसेना शिंदे पक्ष पंचायत समिती चार पैकी दोन जागा राष्ट्रवादी पक्षाला दोन जागा शिवसेना शिंदे पक्षाला मिळाल्या आहेत.
सातारा जिल्हा परिषद त्रिशंकू:भाजपाला एक हाती सत्तेपासून शिवसेना-राष्ट्रवादीने रोखले, वाचा निकाल सविस्तर
