नांदेड (प्रतिनिधी) – बिदर येथे झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद थेट नांदेड शहरात उमटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पंजाब येथून आलेल्या एका प्रवाशाने नांदेडमधील युवकावर गोळीबार केल्याने युवक जखमी झाला आहे. गोळी युवकाच्या पायाला लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. आज सकाळी नांदेड येथून काही प्रवासी स्थानिक वाहनांद्वारे बिदरकडे गेले होते. प्रवासादरम्यान वाहनचालक आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे हाणामारीत रूपांतरित झाल्याची माहिती असून, काही प्रवाशांनी वाहनचालकांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
यानंतर संबंधित वाहने नांदेडमध्ये परतल्यानंतर, वाहनचालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत पंजाबहून आलेल्या प्रवाशांच्या वाहनांचे टायर सोडल्याचा आरोप समोर आला आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि वाद अधिक चिघळला. याच दरम्यान, पंजाब येथून आलेल्या एका प्रवाशाने अचानक जवळील बंदूक काढून गोळीबार केला.
या गोळीबारात कमलप्रीत सिंग नामक युवकाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाला. सध्या परिसरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गोळी लागलेल्या युवकाच्या नावाबाबत प्रशासकीय स्तरावर अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसला, तरी खासदार सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार जखमी युवकाचे नाव स्पष्ट झाले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे.
बिदर येथील वादाचे पडसाद नांदेडमध्ये; प्रवाशाकडून गोळीबार, युवक जखमी
