भुखंडांची गुंठेवारी करण्यासाठी 21 हजार 500 रुपयांची लाच घेणारे मनपाचे सहाय्यक आयुक्त व लिपीक जेरबंद
नांदेड(प्रतिनिधी)-दोन भुखंडांची गुंठेवारी करून देण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 सिडको येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि प्रभारी वसुली लिपीक हे 21 हजार 500 रुपयांच्या लाच जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही लाचखोरांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्रभारी काम हा एक शासकीय कार्यालयातील मोठा अजब प्रकार आहे. नांदेड महानगरपालिकेत क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 सिडको येथे प्रभारी सहाय्यक आयुक्त पदावर संभाजी माधवराव काष्टेवार हे कार्यरत आहेत. तसेच याच कार्यालयात प्रभारी वसुली लिपीक या पदावर महेंद्र जयराम पठाडे कार्यरत आहेत.
दि.8 ऑक्टोबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार प्राप्त झाली की, तक्रारदाराने असदवन येथे सन 2021 मध्ये 12 भुखंड खरेदी केले होते. त्यापैकी भुखंड क्रमांक 2 व 3 ची गुंठेवारी करण्यासाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 येथे जावून माहिती घेतली. तेंव्हा हे भुखंड मनपात पुर्वीच्या मालकाच्या नावाने दाखवत होते. सहाय्यक आयुक्त काष्टेवाड यांना भेटले असता त्यांनी बिल कलेक्टर महेंद्र पठाडे यांना भेटा, मी त्यांना सांगतो, त्याप्रमाणे पुर्तता करा, तुमचे काम होवून जाईल असे सांगितले. यानंतर बिल कलेक्टर महेंद्र पठाडे यांची भेट घेतली असता दोन भुखंडांचे 25 हजार रुपये लागतील त्यात भुखंडांच्या दोन पावत्या मिळतील आणि उर्वरीत पैसे काष्टेवाड आणि माझे असतील असे सांगितले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या लाच मागणीची पडताळणी 9 ऑक्टोबर रोजी केली. त्यावेळी महेंद्र पठाडे यांनी तक्रारदाराकडून पुर्वी मागितलेल्या 25 हजार रुपयांपैकी 3 हजार 499 रुपयांच्या कर पावत्या दिल्या. त्यानंतर दि.15 ऑक्टोबर रोजी संभाजी काष्टेवाडने सुध्दा पंचासमक्ष लाच स्विकारण्याचे मान्य केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात दोन भुखंडांचे 13 हजार 670 रुपये, भुखंडांची नामपरिवर्तन फिस व उर्वरीत 7 हजार 831 रुपये असे एकूण 21 हजार 500 रुपये सिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 येथे स्विकारतांना त्यांना पकडण्यात आले आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक स्वप्नाली धुतराज यांच्या पथकाने ही कार्यवाही पुर्ण केली.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती, एजंट यांनी शासकीय काम करुन देण्यासाठी शासकीय फिस व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास जनतेने दुरध्वनी क्रमांक 02462-253512 किंवा टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.
Post Views: 245