Jayant Patil Sangli Kupwad Election BJP Criticism | भाजपच्या निष्ठावंतांच्या नशिबी फक्त सतरंज्या उचलणे: जयंत पाटलांचा सांगलीत हल्लाबोल; विशाल पाटलांचाही भाजपवर निशाणा – Kolhapur News



सांगलीच्या कुपवाड भागातील प्रभाग क्रमांक 1 मधील विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी, रईसा रंगरेज, शेडजी मोहिते या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत जयंत पाटील महायुती विशेषतः भाजपवर जोरदार टीका केली.

.

जयंत पाटील म्हणाले, काँग्रेसला संपवायला निघालेली भाजप आता काँग्रेसयुक्त झाली आहे. काँग्रेसमधून गेलेल्या नेत्यांनी भाजप ताब्यात घेतली आहे, तर भाजपचे निष्ठावान फक्त सतरंज्या उचलत आहेत, असा टोला पाटलांनी लगावला. तसेच महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिलेल्या मोठ्या नेत्यांची नावे भाजपला पुसायची आहेत, मतदारांनी त्यांना धडा शिकवावा असे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, काँग्रेसला या देशातून हाकला असे भाजपची लोक म्हणत होते, पण आजची भाजप ही काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. आज भाजपमध्ये एवढे काँग्रेसचे लोक गेलेत की निष्ठावंत भाजपवाले सतरंज्या उचलत आहेत. जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेत त्यांनी भाजप पक्षाचा ताबा घेतला आहे.

भाजप हा वाममार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आता महापालिकेच्या निवडणुकीत देखील प्रचंड पाऊस पडेल. डोहात बुडून जाईल इतका पाऊस पडणार आहे. पण यावेळी लोकांनी खंबीरपणे या पावसात उभे राहावे. आम्ही निवडणुकीत पडणाऱ्या पावसाच्या विरोधात नाही. निवडणुकीत पडणाऱ्या पावसाने तुमच्या घरात पाणी जरी आले तरी आमचा विरोध नाही, त्या पावसात आंघोळ करून घ्या. पण पुढच्या पाच वर्षासाठीची महापालिका निवडणुकीची सत्ता मिळवण्यासाठी हा पाऊस पडतोय हे मतदारांनी लक्षात ठेवावे, असे जयंत पाटील यांनी भाजपवर टीका करताना म्हटले.

पुढे बोलताना जयंत पाटील ड्रग्स प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले, आज सांगलीत नशेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पोलिसांना नशा नेमकी होते कुठे हे सापडत नाही. मोठ्या प्रमाणावर सांगलीत खून होत आहेत. ब्रिटिशांच्या विरोधात वसंतदादा लढले, सांगलीचा तुरुंग फोडून बाहेर आले, अशा वसंतदादांच्या मनोवृत्तीचे हे सांगली शहर आहे. जे ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसे शरण जाईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, सांगली करू चांगली असे सध्याच्या पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी सांगलीत येऊन घोषणा केली होती. पण आतापर्यंत सांगलीला काही मिळाले नाही. भाजपने आतापर्यंत वेगवेगळ्या शहरांमध्ये दिलेली आश्वासन फेल झाली आहेत. परवा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगलीत येऊन मोठी आश्वासने सांगलीसाठी दिली. मात्र गेली अनेक वर्षे राज्यात कुणाची सत्ता आहे?

सांगली शहराचा विकास का केला नाही?

यावेळी खासदार विशाल पाटील यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि त्या अनुषंगाने भाषणात सांगली शहरासाठी केलेल्या घोषणा ऐकून माझे डोके दुखायला लागले. मुख्यमंत्री नेमके 2014 चे भाषण करत होते की 2021 सालचे करत होते हे कळले नाही. कारण देशात पंतप्रधान भाजपचे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देखील भाजपचे आहेत, मग आतापर्यंत या लोकांनी सांगली शहराचा विकास का केला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना मुळात काँग्रेसने कर्नाटकात यशस्वीपणे राबवली होती, तिचीच नक्कल भाजपने महाराष्ट्रात केली असून त्याचा त्यांना निवडणुकीत काही अंशी लाभ मिळत आहे. मात्र, केवळ पैशाच्या बळावर राजकारण करणाऱ्या भाजपला मतदारांनी योग्य वेळी झटका दिला तरच लोकशाहीत सामान्य जनतेची किंमत राहील, असा इशारा त्यांनी दिला. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून मोठी घराणी आपल्या पक्षात ओढणे, हे सुदृढ राजकारणाचे लक्षण नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

विलासरावांच्या संदर्भातील विधानाचा निषेध

दुसऱ्या परिच्छेदात पाटील यांनी भाजपच्या सांस्कृतिक आणि वैचारिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लातूर येथे भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा विचार संपवण्याची भाषा केल्याचा संदर्भ देत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजपला राज्याचा खरोखर विकास करायचा आहे की ज्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात मोठे योगदान दिले, त्यांची नावे आणि वारसा पुसून टाकायचा आहे, असा बोचरा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि विकासाची परंपरा जपणाऱ्या नेत्यांच्या विरोधात जाणारी भाजपची ही भूमिका चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *