![]()
भाजपने एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढला. एकनाथ शिंदे यांच्या मागे सध्या राहू किंवा शनिदोष आहे का? याची खात्री त्यांनी एखाद्या
.
विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीच्या चर्चेसह विविध मुद्यांवर प्रकाश टाकला.वंचित बहुजन आघाडीने मुंबईत काँग्रेसला 60 जागा मागितल्याची माहिती आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने कोणत्या जागांवर दावा केला आहे हे मला माहिती नाही. मी त्या प्रक्रियेत नाही. आमच्या मुंबईतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर मी हे सांगू शकेन. पण आज सायंकाळी किंवा रात्री उशिरा चर्चा पूर्ण होईल. उमेदवारी दाखल करण्यास आणखी 2 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यात दोन पाऊल मागे – पुढे करून कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.
राज्यात कुणाचा पायपोस कुणाशी नाही
सध्या दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे. पण शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ही चर्चा फिस्कटल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे ते डोकावून पाहण्याचा अधिकार मला नाही. पण त्यांच्या चर्चा पुढे खूप गेल्याचे मी ऐकले आहे. त्यांच्यात घड्याळावर लढा व तुतारीवर लढा असा विषय सुरू आहे. मला ज्यावेळी यासंदर्भात त्यांच्या बैठका झाला, त्याचवेळी आम्ही निर्णय घेतला की, शरद पवार अजित पवारांसोबत जात असतील तर आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची असे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
त्यामुळे त्यांनी काय करायचे, त्यांच्याकडे कसे बघायचे हे आमचा अधिकार नाही. त्यांचे कार्यकर्त्यांकडे हा अधिकार आहे. जनता हा सगळा धिंगाणा पाहत आहे. कुणाचा पायपोस कुणाशी नाही. वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या व युत्या होत आहेत. राजकारणाचा चिखल झाला आहे. त्या चिखलात सर्वांच्या अंगावर डाग पडत आहेत. कितीही धुतले तरी हे डाग साफ होतील असे दिसत नाही. एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण व गोंधळलेली परिस्थितीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. यापूर्वी केव्हाही अशी परिस्थिती निर्माण झाली नाही.
एकनाथ शिंदेंना ज्योतिषाकडे जाण्याचा सल्ला
भाजपने ठाण्यात नमो भारत, नमो ठाणे असा प्रचार सुरू केला आहे. पत्रकारांनी याविषयी वडेट्टीवारांना छेडले असता त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपली पत्रिका एखाद्या ज्योतिषाकडे दाखवण्याचा सल्ला दिला. मी यावर काय बोलू. कुणी नमो म्हणो, कुणी सुमो म्हणो, कुणी रमो म्हणो. हा त्यांचा प्रश्न आहे. पण एक आहे की, सध्या एकनाथ शिंदेंच्या मागे राहू दोष किंवा शनी दोष आहे का? याची खात्री त्यांनी एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन करून घेतली पाहिजे. राहू, केतू आदी ग्रह त्यांना शांतपणे जगू देतील का, त्यांच्या मागे काही अडचणी आहेत का अशी शंका या प्रकरणी येत आहे, असे ते म्हणाले.
महायुती सरकार जनतेच्या परीक्षेत नापास
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलावण्याच्या मुद्यावरूनही भाजप व महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांत योगींची गरज वाटत असेल, तर हे भाजपचे अपयश आहे. राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्ष जनतेच्या परीक्षेत नापास झालेत. त्यामुळे भाजपवर दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलावून पास होण्यासाठी मदत घेण्याची वेळ आली आहे. योगींची गरज वाटते म्हणजेच आपल्या हेडमास्तरला वर्ग सांभाळता येत नाही. त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळायचा अशी परिस्थिती दिसत आहे.
निवडणुकीत ध्रुवीकरण करण्याची भाजपची जुनी परंपरा आहे. ध्रुवीकरण केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही. त्यांना यशही मिळत नाही. ते मते मिळवण्यासाठी प्रांतवाद आणतील, पण बोट दुसऱ्याकडे दाखवतील. धर्मवाद आणतील, पण बोट दुसऱ्याकडे दाखवतील. या सगळ्या गोष्टी ते आणतील. सगळ्या प्रकारचे फंडे करून निवडणूक कोणत्याही परिस्थिती जिंकायची हा त्यांचा प्रयत्न आहे. सगळ्या गोष्टी करून यश दिसत नसेल, तर शेवटी निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला आहे, असे ते म्हणाले.
