सटाणा महाविद्यालयात परीक्षार्थींना वैद्यकीय सुरक्षा:डॉ. हर्षल देवरे यांनी पाच वर्षांत शंभराहून अधिक विद्यार्थ्यांवर केले उपचार‎




बारावी परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडल्याने परीक्षा केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले; मात्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. हर्षल देवरे यांनी तातडीने धाव घेत उपचार केल्याने विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर झाली. त्यांच्या समयसूचकतेमुळे संभाव्य गंभीर प्रसंग टळला. कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीची परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी डॉ. देवरे गेल्या पाच वर्षांपासून विनामूल्य वैद्यकीय सेवा देत आहेत. मंगळवारी (दि. १०) परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीची प्रकृती अचानक खालावली. तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासल्याने डॉ. देवरे यांनी तत्काळ उपचार केले. त्यांच्या तत्परतेमुळे विद्यार्थिनीला दिलासा मिळाला. आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक विद्यार्थ्यांवर मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. डॉ. देवरे हे या महाविद्यालयाचेच माजी विद्यार्थी असून मातृसंस्थेबद्दलच्या आत्मीयतेतून ते हा उपक्रम राबवत आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, विभागप्रमुख प्रा. नीलेश शेवाळे, प्रा. राहुल सोनवणे, प्रा. प्रफुल्ल ठाकरे आदी उपस्थित होते. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. तणावाच्या वातावरणात वैद्यकीय मदत सहज उपलब्ध होत असल्याने पालकांनाही दिलासा मिळत आहे. डॉ. देवरे यांच्या या सेवाभावी वृत्तीचे पालक, शिक्षक आणि नागरिक स्तरावरून विशेष कौतुक होत असून, हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. आदर्श उपक्रमाचे कौतुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *