पोलिस बनून तरुणाला लुटले:मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावरील घटना, 1.32 लाख रुपये लंपास




पुणे प्रतिनिधी: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावर पोलिस असल्याची बतावणी करून एका तरुणाला लुटण्यात आले. चोरट्याने तरुणाचा मोबाईल घेऊन त्याच्या बँक खात्यातून १ लाख ३२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केले. या प्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहणारा तक्रारदार तरुण आणि त्याचा मित्र बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावर एका खासगी प्रवासी वाहतूकदाराच्या थांब्याजवळ थांबले होते. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवून स्वतःला पोलिस असल्याचे सांगितले आणि धमकावण्यास सुरुवात केली. धमकावून तरुणाचा मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर चोरट्याने ऑनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करून तरुणाच्या बँक खात्यातून १ लाख ३२ हजार रुपयांची रोकड आपल्या खात्यात वर्ग केली. त्यानंतर चोरटा तरुणाचा मोबाईल घेऊन पसार झाला. पोलिस कर्मचारी एस. भोरडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, शहरात आणखी दोन मोठ्या चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेले. ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोकमान्यनगर परिसरात घडली. याबाबत ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला सिंहगड रस्ता भागात राहतात. त्या लोकमान्यनगर परिसरातून जात असताना त्यांच्या मागावर असलेल्या चोरट्याने हे कृत्य केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन. कारके तपास करत आहेत. तिसरी घटना सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील श्री समर्थ सोसायटीत घडली. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातील १ लाख ३९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही चोरी ९ जुलै रोजी सकाळी घडली. या प्रकरणी ५० वर्षीय महिलेने नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात, विशेषतः हडपसर आणि बिबवेवाडी भागातील सोसायट्यांमध्ये भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *