दुरवस्था:भिंगारच्या स्मशानभूमीत सुविधांचा अभाव, दुःखाच्या प्रसंगातही होताहेत हाल, सुविधांसाठी आंदाेलनाचा इशारा‎




भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्‍वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या मूलभूत सुविधेकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना दुःखाच्या प्रसंगातही प्रचंड मनस्ताप आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे अंत्यविधी करणे म्हणजे मृताच्या नातेवाईकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. ही स्मशानभूमी भिंगार पंचक्रोशीसह नागरदेवळे उपनगरातील नागरिकांसाठी अंतिम संस्काराचे प्रमुख ठिकाण आहे. दररोज या ठिकाणी अनेक अंत्ययात्रा येत असतात. मात्र, येथील अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेला पत्र्याचा शेड पूर्णपणे जीर्ण झाला असून, त्याला जागोजागी मोठी भगदाडे पडली आहेत. यामुळे पावसाळ्यात शेडमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने सरण रचणे आणि अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडणे अशक्य होते. अनेकदा मुसळधार पाऊस सुरू असताना अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यास, पाऊस थांबेपर्यंत नातेवाईकांना मृतदेहासह ताटकळत उभे राहावे लागते. स्मशानभूमीचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वारही गंजून खाली कोसळले आहे. त्यामुळे परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप सुधारणा झालेली नाही. येथे नवीन मजबूत शेड उभारणे, नवीन गेट बसविणे आणि नियमित देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. मानवी संवेदनांशी निगडित असलेल्या या संवेदनशील प्रश्नावर प्रशासनाने तातडीने पावले उचलून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी तीव्र मागणी आता सर्वसामान्य ग्रामस्थांमधून केली जात आहे. स्मशानभूमीतील शेडची झालेली दुरवस्था. मानवी संवेदनांची पायमल्ली, तातडीने काम सुरू करावे ^स्मशानभूमीची दुरवस्था हा केवळ सुविधांचा तुटवडा नसून मानवी संवेदनांशी जोडलेला अत्यंत गंभीर प्रश्न आहे. दुःखाच्या प्रसंगातही नागरिकांना मृतदेहासह पावसात ताटकळत राहावे लागणे दुर्दैवी असून, प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून काम सुरू करावे. – जालिंदर बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *