महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, छत्रपती संभाजीनगरमधील प्रभागांमधील वास्तव परिस्थिती, स्थानिक प्रश्न आणि राजकीय भूमिका नागरिकांसमोर मांडण्यासाठी ‘दिव्य मराठी’ ॲपने सुरू केलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या विशेष मालिकेला मोठा प्रतिस
.
महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असताना छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 7 राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरत आहे. विकासकामांचे दावे, अपयशाचे आरोप, पाणी-ड्रेनेजसारख्या मूलभूत प्रश्नांवरून सुरू असलेली वादळं आणि पक्षांतील परस्पर दोषारोप यामुळे हा प्रभाग चांगलाच तापलेला दिसतो. कोण काय म्हणतंय, कुणाचा दावा कितपत खरा आहे आणि मतदारांसाठी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत, याचे चित्र या संवादातून स्पष्ट होत आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माजी नगरसेविका पद्मा शिंदे यांनी विकासकामांच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली. हडको-सिडको परिसरातील रस्त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी या प्रभागात नगरसेवक नव्हते का, असा सवाल उपस्थित करत, प्रत्यक्षात रस्त्यांची बहुतेक कामे ही शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या इच्छुक उमेदवार पूजा कैलास सोनवणे यांनीही निधीच्या मुद्द्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला आजवर सर्वाधिक निधी दिला असल्याचा दावा करत, विशेषतः पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. हडको परिसरातील रस्तेही देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी तुषार सुरासे यांनी मात्र शहरातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न हा सर्वात गंभीर मुद्दा असून, नागरिकांना आठ दिवसांतून केवळ एकदाच पाणी मिळते, असा आरोप त्यांनी केला. यासोबतच ड्रेनेज लाईनची समस्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नांवर उपाय करण्यासाठी केवळ राजकीय अनुभव नव्हे, तर शिक्षित आणि सक्षम उमेदवारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी मतदारांना पटवून दिले. पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे झाली असून, त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्येही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही सुरासे यांनी दिले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार गौरव पुरंदरे यांनी महायुती सरकारवर आणि जुन्या नगरसेवकांवर जोरदार टीका केली. प्रभाग क्रमांक 7 मध्ये ड्रेनेजची समस्या अत्यंत गंभीर असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील टीव्ही सेंटर चौकातही ड्रेनेजचे पाणी साचत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रभागातील माजी नगरसेवकांना जबाबदारीने काम करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीतील घटक पक्ष एकमेकांत भांडत असले तरी, खरे महत्त्व प्रभागातील प्रश्नांचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते चांगले झाले की ड्रेनेज लाईन आठवते आणि ड्रेनेज टाकल्यानंतर पुन्हा रस्ते फोडले जातात, हे केवळ भ्रष्टाचारासाठीच केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. साडेतीनशे कोटी रुपयांची समांतर जलवाहिनी योजना चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या प्रयत्नातून आली होती, मात्र भाजपने या योजनेला विरोध केला, असा दावा त्यांनी केला.

गौरव पुरंदरे यांच्या या आरोपांना भाजपचे माजी नगरसेवक महेश माळवतकर यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. जलवाहिनी योजना पूर्ण होऊ न देण्यास उद्धव ठाकरे गटच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शहरातील पाणीपुरवठा योजना जाणीवपूर्वक रखडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या काळात केंद्र सरकारकडून या योजनेसाठी निधी मिळवून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सध्या प्रभागातील अनेक रस्ते चांगल्या स्थितीत असल्याचे सांगत, विकासकामांवर महायुती सरकारचा ठसा उमटल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष गणेश साळुंखे यांनी वेगळ्याच मुद्द्यांकडे लक्ष वेधले. प्रभाग क्रमांक 7 मध्ये गुन्हेगारी वाढत असून, नशा करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी दोन दिवसाआड पाणी येत होते, मात्र आता आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपचे इच्छुक उमेदवार सतीश छापेकर यांनी मात्र शिवसेनेवर जोरदार टीका केली. शहरातील खासदार, आमदार आणि नगरसेवक हे दीर्घकाळ शिवसेनेचेच होते, मग ते उद्धव ठाकरे गटाची असो वा एकनाथ शिंदे गटाचे, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेनेच महानगरपालिका ‘खड्ड्यात घातली’ असून, शिवसेनेचे नेते भूखंड माफिया असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

एमआयएम पक्षाचे इच्छुक उमेदवार रवी हिवराळे यांनी शहरातील विकासाच्या दिशेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन्ही शिवसेना गट आणि भाजप यांनी शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याचा आरोप करत, मराठी शाळा बंद पडत असल्याचा मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला. मराठीच्या नावावर राजकारण करणारेच पक्ष मराठी शाळा विकत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी शहरात 187 मराठी शाळा होत्या, मात्र आता केवळ 32 शाळा उरल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा शिवसेना-भाजप सत्तेत आल्यास उरलेल्या शाळाही विकल्या जातील, असा आरोप त्यांनी केला.
राहुल कुमार सोनवणे यांनीही विद्यमान राजकारणावर नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून तेच चेहरे नगरसेवक म्हणून निवडून येत असून, उद्याने, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा दुर्लक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या व्हिजनने काम होणे अपेक्षित होते, मात्र निवडणुका केवळ रस्ते, ड्रेनेज आणि लाईटपुरत्याच मर्यादित राहिल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे यावेळी तरुण पिढीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी नीलेश शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. मागील 70 वर्षांत जेवढा निधी शहराला मिळाला नाही, तेवढा निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळाल्याचा दावा त्यांनी केला. शहरात 1550 कोटी रुपयांचे रस्ते तयार झाले असून, 190 कोटी रुपयांच्या ड्रेनेज लाईनला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहिता लागू झाल्यामुळे काम सुरू होऊ शकले नसले तरी, ती संपल्यानंतर तात्काळ काम सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलावरून भ्रष्टाचाराचे आरोप
टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलावरून एमआयएमचे रवी हिवराळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना महेश माळवतकर यांनी विरोध केला. खेळाडूंसाठी असलेले मैदान व्यापारी वापरासाठी वापरले गेल्याचा आरोप हिवराळे यांनी केला, तर या संकुलामुळे शहराचा विकास झाल्याचे माळवतकर यांनी सांगितले. माजी नगरसेवक मोहन मेघावले यांनीही परिसरातील रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा व्यवस्थित असल्याचा दावा केला. आगामी काळात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास, येथे अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

