![]()
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे १३ व १४ जुलै २०२६ रोजी अनधिकृत बांधकामांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. सलग २० तास चाललेल्या या मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड आणि व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन दिवसीय मोहीम राबविण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अत्यंत चोख नियोजन केले होते. या कारवाईसाठी एकूण १,००० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यात ६५० पोलीस अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) ५० जवान, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि ‘पीएमआरडीए’च्या अग्निशमन दलाचे ३० जवान यांचा समावेश होता. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले होते. १२ पोकलॅन, १२ जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर, हायड्राक्रेन आणि गॅसकटर यांसारख्या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका, खेड येथील विद्युत पुरवठा विभाग, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. ‘पीएमआरडीए’चे दक्षता अधिकारी आणि पोलीस अधीक्षक अमोल झेंडे, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे, ‘पीएमआरडीए’चे सहआयुक्त हिम्मत खराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, महाळुंगेचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, तहसीलदार रवींद्र रांजणे, तहसीलदार आशा होळकर, उपअभियंता रितेश मुंढे आणि तपन डंके आदी अधिकारी दोन्ही दिवस घटनास्थळी उपस्थित होते.
पीएमआरडीएने मोई येथे 35 हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले:680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त; 1000 अधिकारी-कर्मचाऱ्यांसह 20 तास कारवाई
