SIR वरून देवेंद्र फडणवीस-काँग्रेसमध्ये जुंपली:‘बेकायदेशीर मुख्यमंत्री’ फडणवीसजी, उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका; कॉंग्रेसचा पलटवार




मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपिल सिब्बल यांचा थेट संसदेतील ऐतिहासिक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर कॉंग्रेसची डबल ढोलकी म्हणत हल्लाबोल केला होता. यावर आता कॉंग्रेसने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्ञानेश कुमारांना पाठीशी घालणे थांबवा देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना ‘बेकायदेशीर मुख्यमंत्री’ फडणवीसजी, उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका! असे म्हणत कॉंग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. कॉंग्रेसने म्हटले की, कपिल सिब्बल यांच्या 2013 मधील भाषणाचा व्हिडिओ दाखवून SIR विरोधात काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचा आव आणण्यापूर्वी, त्या भाषणाचा नेमका संदर्भ समजून घ्या. या क्लिपमध्ये सिब्बल यांनी SIR चा उल्लेखही केलेला नाही. मतदार याद्यांच्या नियमित पुनरीक्षण प्रक्रियेचा संदर्भ आणि आज निवडणूक आयोग राबवत असलेली SIR प्रक्रिया यांची गल्लत करून जनतेची दिशाभूल करू नका, ज्ञानेश कुमारांना पाठीशी घालणे थांबवा. जनतेला सगळं कळतंय. तसेच फडणवीसजी, प्रश्न मतदार याद्या अद्ययावत करण्याला विरोध करण्याचा नाही; तर त्या नावाखाली सामान्य मतदारांना वेठीस धरण्याचा असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. लोकशाहीत मतदार हा सत्ताधाऱ्यांच्या संशयाचा विषय नसतो पुढे कॉंग्रेसने म्हटले की, आज मतदारांना पुन्हा पुन्हा फॉर्म भरायला लावणे, ‘Unmapped’ आणि ‘Logical Discrepancies’ सारख्या निकषांमुळे त्यांना संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे, फॉर्म 6 सोबत जोडलेले बेकायदेशीर घोषणापत्र, फॉर्म 7 च्या गैरवापरासंबंधी उपस्थित होणारे प्रश्न तसेच आतापर्यंत 13 कोटी नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, या सगळ्यांवर बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. 2013 मधील भाषणाचा दाखला देऊन आजच्या प्रक्रियेतील प्रश्नांना बगल देता येणार नाही. मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची हमी द्या. लोकशाहीत मतदार हा सत्ताधाऱ्यांच्या संशयाचा विषय नसतो; तो लोकशाहीचा मालक असतो, अशा शब्दांत कॉंग्रेसने फडणवीसांवर पलटवार केला आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. काँग्रेसची डबल ढोलकी स्वतःच्याच मंत्र्यांच्या विधानाने उघडी!:संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी कपिल सिब्बल यांचा जुना व्हिडिओ केला शेअर मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट संसदेतील ऐतिहासिक पुराव्यासह काँग्रेसचा बुरखा फाडला आहे. संपुआ (UPA) सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेचे ठाम समर्थन करत दिलेले स्पष्टीकरण आणि अधिकृत रेकॉर्डवरील व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. “काँग्रेसच्या राजकारणाचे रंग सोयीनुसार बदलले, तरी संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत,” असा घणाघाती टोला लगावत फडणवीस यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *