नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांनी आता आपला मोर्चा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वळवला
.
इथेनॉलमिश्रित पेट्रोल आणि डिझेलच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर गंभीर आरोप केलेत. “सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलमिश्रित डिझेल आणि पेट्रोल टाकून एका बाजूला गाड्यांचे अतोनात नुकसान केले जात आहे, तर दुसरीकडे इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वारेमाप पैसा कमावला आहे. एकीकडे हा उघड भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळण्याचा प्रकार आहे. देशामध्ये इथेनॉलच्या नावाने एक मोठा स्कँडल झाला असून, हे कांड करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून मोदी सरकारमधीलच एक मंत्री आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची पंतप्रधान मोदींनी तातडीने माफी मागावी आणि नितीन गडकरींचा तत्काळ राजीनामा घ्यावा,” अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीये.
उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा ‘खड्डामंत्री’ असा उल्लेख
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी आणि ‘कॉकरोज जनता पार्टी’च्या तीव्र आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना पद सोडावे लागले. या यशाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंच्या वतीने ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला.
भाषणादरम्यान नितीन गडकरींचा उल्लेख करताना उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला उपरोधाने त्यांना “खड्डामंत्री” असे संबोधले आणि नंतर लागलीच दुरुस्ती करत “केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी” असा उल्लेख केला. “इथेनॉलच्या मुद्द्यावर आणि इंधनातील भेसळीवर येत्या काळात मोठी चर्चा होणार आहे आणि हा वाद अधिक पेटणार आहे,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी आता थेट नितीन गडकरींना लक्ष्य केल्याने केंद्र सरकार आणि भाजप यावर काय भूमिका घेते, हे पाहावे लागणार आहे.
हे ही वाचा…
धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता:पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला थेट ‘घरचा आहेर’ दिला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर देशात लाठीचार्ज अन् संतापाची लाट पसरली नसती,” अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. सविस्तर वाचा…
धावत्या लोकलमधून प्रवाशाला लाथ मारून खाली पाडले?:मुंबईत टीसीवर गंभीर आरोप, रेल्वे प्रशासनाच्या तपासणीत वेगळीच माहिती समोर

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मारामारी आणि वादाच्या घटना समोर येत असतानाच आता एका अजब आणि धक्कादायक प्रकरणामुळे मध्य रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तिकीट तपासनिसाने (TC) दंड भरण्यासाठी पैसे नसलेल्या विनातिकीट प्रवाशाला थेट धावत्या लोकलमधून लाथ मारून रुळांवर ढकलल्याचा खळबळजनक आरोप एका सहप्रवाशाने केला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने आरपीएफच्या ‘सीसीटीव्ही फुटेज’चा दाखला देत हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. सविस्तर वाचा…
