![]()
शहरात ९०च्या दशकातील कामगार नेता व डॉन बाबा फर्जनच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या कारवाईनंतर संपूर्ण घबाड समोर आले आहे. या संपत्तीचे मूल्य सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घरात आहे. यानंतर छावणी पोलिसांनी फर्जनच्या मुलांना चौकशीसाठी बोलावले होते. एक मुलगा फिरदोस फर्जन हजर झाला आहे. त्याने ‘दिव्य मराठी’शी केलेल्या संवादात, ही आमच्या वडिलांची संपत्ती असल्याने यावर आमचाच दावा असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, यातील अटक आरोपी शीलाबाई साळवे हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली. बाबाच्या नावे मिटमिटा भागातील बंगल्याच्या आजूबाजूला ६ एकर जमीन आहे. रोहिला गल्ली परिसरातील बंगला व दीड एकरवर पसरलेला कारखाना आहे. यातील मिटमिटा भागातील जमिनीचे बाजारमूल्य २२ कोटींच्या घरात आहे, तर रोहिला गल्ली येथील ४० कोटींच्या घरात असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. बंगल्यात सापडलेली ५.२७ कोटी त्यावर दंड लागून रक्कम वजा केल्यास बाबाच्या नावे सद्य:स्थितीत ६५ कोटींची मालमत्ता आहे. या सर्व मालमत्तेवर मुलगा म्हणून आमचाच दावा असल्याचे वयाच्या २०व्या वर्षी घर सोडून गेलेल्या फिरदोस यांनी म्हटले आहे. काडतुसे जुनीच, राज्यासह परराज्यातील कंपन्यांची सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा फर्जन यांच्या बंगल्यात सापडलेली रायफल, पिस्तूल, एअर गनची जप्त केलेली तब्बल ६३५० काडतुसे मुंबई, पुणे, बंगलोर व मध्य प्रदेश येथून खरेदी केल्याचे समोर आले आहे. ही सर्व जुनीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण यातील काडतुसे बनवणाऱ्या काही कंपन्या बंद झाल्या आहेत. काडतुसांची खरेदी कोणत्या मार्गाने झाली याचे व घरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण सुरू आहे. शीलाबाई आमची आई नाही सध्या घरात राहणारी व अटकेतील शीलाबाई साळवे ही त्यांची पत्नी नसून केवळ एक केअरटेकर म्हणून तेथे राहत असल्याचा दावा फिरदोस यांनी केला आहे. लोकांसाठी माझे वडील डॉन असतील, पण आमच्यासाठी ते चांगले पिता होते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बाबाचे वारसदार कोण यावरून वाद रंगणार आहे. शीलाबाई हिने ठाण्यात बाबाच्या ‘दोरडी’ आडनावानेच स्वाक्षरी केल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही वडिलांचे निधन झाल्याचे सांगून बोलवले आम्हाला २७ मार्चला बाबाकडच्या काही लोकांकडून त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही त्याच वेळी शहरात आलो होतो, मात्र त्या वेळी बाबा जिवंत असल्याचे दिसले होते. त्या वेळी आम्हाला खोटी माहिती देऊन का बोलावण्यात आले, याबाबतदेखील आम्हाला काही माहिती नाही. आतादेखील त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी आम्हाला घरातून दिली गेली नाही, तर इतर बाहेरच्या लोकांकडून आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली, असेही फिरदोस म्हणाले.
बाबा फर्जनच्या 65 कोटींच्या संपत्तीवर 30 वर्षांनी परतलेल्या मुलांचा दावा:‘ही आमच्या वडिलांची संपत्ती असल्याने त्यावर आमचाच दावा,’ फिरदोस फर्जनची ‘दिव्य मराठी’ला माहिती
