नांदेड(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि उपमहापौर दिपकसिंग रावत यांनी आज शहरातील गोवर्धनघाट स्थित वैकुंठधाम स्मशानभूमींला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. शहराचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सार्वजनिक सुविधांच्या सक्षमीकरणावर भर देण्याच्या दृष्टीकोणातुन ही पाहणी करण्यात आली.
या पाहणी दरम्यान स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता नेटकी ठेवण्यासह मोडकळीस आलेल्या पिंजर्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश महापौर सौ.मुळे यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे अंत्यविधीसाठी येणार्या नागरिकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, बसण्यासाठी बेंचेस आणि पुरेसा प्रकाश (स्ट्रीट लाईट्स) असणे आवश्यक असून, नादुरुस्त दिवे त्वरित बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या.स्मशानभूमीतील मुख्य ओटे आणि शेडची दुरवस्था झाली असल्यास त्याची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश उपमहापौर रावत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. याठिकाणी विद्युत दाहिनींचे काम बर्याच दिवसापासून प्रलंबित असुन या विद्युत दाहीनीचे काम तातडीने पूर्ण करण्याची सुचना यावेळी महापौरांनी केली.
यावेळी महापौर सौ.कविता संतोष मुळे म्हणाल्या की, नांदेड शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन तत्परतेने काम करेल. या पाहणी दौर्यात सभागृह नेते ड.महेश कनकदंडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
Post Views: 4
