![]()
खून प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात लाच मागणाऱ्या एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. बारामती येथील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात या हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश लक्ष्मण नागटिळक (वय ४२, रा. शारदानगर, माळेगाव, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी एका ४६ वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार महिलेच्या मुलावर बारामती परिसरातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या करंजेपुल चौकीत नियुक्त असलेले पोलीस हवालदार नागटिळक करत होते. महिलेच्या मुलाला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी नागटिळक याने सुरुवातीला उपनिरीक्षकासह ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. पैसे न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील तक्रारदार यांना पोलीस कर्मचारी यांनी धमकावले. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे रितसर तक्रार दाखल केली.एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, नागटिळक याने तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपनिरीक्षकाने लाच मागितली असल्याचे तपासात स्पष्ट झाले. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात नागटिळक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे करत आहेत.
खून प्रकरणात मदत करण्यासाठी लाच मागितली:बारामतीतील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली
