छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वच्छता जनजागृतीसाठी पथनाट्य सादर:"सफाई अपनाओ, बिमारी भगाओ" अभियानांतर्गत जिजाऊ चौकात आयोजन




छत्रपती संभाजीनगर येथे “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या विशेष स्वच्छता जनजागृती अभियानांतर्गत पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. मनपाच्या IEC टीमद्वारे आयुक्त अमोल येडगे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथनाट्य जिजाऊ चौकात सादर झाले. प्रभाग क्रमांक ०७ च्या पुढाकाराने प्रभाग ०७, ०८ आणि १० च्या संयुक्त सहभागातून हा कार्यक्रम पार पडला. बालविकास विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिकमुक्त परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत संदेश दिला. “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या अभियानाचा प्रभावी संदेश त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवला. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक वैभव साबळे, प्रभाग प्रभारी ऋषिकेश घोरपडे, मनपा जवान सुधाकर सोनवणे, प्रशांत मस्के, विकी हिवराळे, मस्के मामा, सुपरवायझर विनोद मस्के, सुधीर मस्के आणि सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमादरम्यान, उपस्थित नागरिक आणि परिसरातील अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना ओला व सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे महत्त्व, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि पर्यावरण संवर्धनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” अभियानाची उद्दिष्ट्येही स्पष्ट करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन प्रभाग क्रमांक ०७ ने केले होते, तर प्रभाग ०७, ०८ आणि १० च्या IEC प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग नोंदवला. “स्वच्छता हीच खरी सेवा – सफाई अपनाओ, बिमारी भगाओ!” या संदेशावर भर देण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि हरित छत्रपती संभाजीनगरच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *