![]()
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार (वय ५०) यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पुणे शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सर्जेराव कुंभार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे गावाचे रहिवासी होते. यापूर्वी ते विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांची लोणीकंद पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. १ जानेवारी रोजी पार पडलेल्या अभिवादन सोहळ्याचा बंदोबस्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडला होता. ३१ जानेवारी रोजी दिवसभर ते पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. रात्री साडेनऊच्या सुमारास कामकाज आटोपून ते वडगाव शेरी येथील घरी परतले. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने खराडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. कुंभार यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातील त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पादचारी तरुणाला धमकावून लुटले पादचारी तरुणाला धमकावून चोरट्यांनी लुटल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. याबाबत एका तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी तरुण मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरुन निघाला होता. लोणी रेल्वे स्थानक परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला अडवले तरुणाला धमकावून दुचाकीवरुन घेऊन चोरटे तेथून गेले. काही अंतरावर तरुणाला धमकावून त्याच्याकडील अडीच हजार रुपये, ईअर बडस असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत.
लोणीकंद पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन:हृदयविकाराच्या धक्क्याने 50 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
