म्हैसमाळला भक्तिभावाचा उत्सव सुरू:श्री गिरिजामातेच्या यात्रोत्सवाला झाली सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी‎

0
240_1769951271697f50271e7ef_16350142767.jpg




तालुक्यातील म्हैसमाळ येथील मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या श्री गिरिजामातेच्या वार्षिक यात्रामहोत्सवाला रविवारी (दि. १) भक्तिभावात व उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून संपूर्ण म्हैसमाळ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. यात्रेची पूर्वतयारी म्हणून २९ जानेवारी रोजी पारंपरिक काठी स्थापना विधीने यात्रेचा औपचारिक प्रारंभ झाला होता. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजता श्री गिरिजामातेची महापूजा व विशेष अलंकार पूजा गिरिजादेवी संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावात पार पडली. या वेळी ‘जय गिरिजामाता’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. दिवसभर गिरिजामातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेली पारंपरिक काठी मिरवणूक मध्यरात्री १२ वाजता ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली असून भाविकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता होती. ४ फेब्रुवारी रोजी सांगता श्री गिरिजामातेचा हा यात्रा महोत्सव बुधवारी (दि. ४) सकाळी ८ वाजता महाभिषेकाने होणार असून तोपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी म्हैसमाळ परिसर भक्तिमय राहणार आहे. संस्थानच्या वतीने भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन चार दिवस चालणाऱ्या यात्रेचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षा व सुविधा सज्ज; एसटीची विशेष बससेवा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वाहनतळ, प्राथमिक आरोग्य सुविधा व शिस्तबद्ध दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून छत्रपती संभाजीनगर- म्हैसमाळ, कन्नड, फुलंब्री, वैजापूर व पैठण येथून विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed