ऑनलाइन ट्रेडिंगसाठी शेजाऱ्याच्या घरात चोरी, तरुण अटकेत:पुणे पोलिसांकडून 70 हजारांचे दागिने जप्त




पुणे पोलिसांनी ऑनलाइन ट्रेडिंगच्या मोहात शेजाऱ्याच्या घरात चोरी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे नाणे जप्त करण्यात आले आहे. प्रतीक राजेंद्र शर्मा (वय १९, रा. कमलप्रभा सोसायटी, काेंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत येवलेवाडी पोलीस ठाण्यात एका नागरिकाने फिर्याद दिली होती. तक्रारदार कमलप्रभा सोसायटीत राहतात. ते कामावर जाताना आपल्या सदनिकेची चावी सोसायटीच्या रखवालदाराकडे ठेवत असत. नुकतीच त्यांच्या सदनिकेचे कुलूप उघडून दागिने आणि चांदीची नाणी चोरल्याची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, ते बंद असल्याचे आढळले. तसेच, तक्रारदाराच्या सदनिकेबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यास चिखल लावल्याचे दिसून आले. यामुळे आरोपी माहितगार असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण बंद करण्यापूर्वीचा घटनाक्रम तपासला. त्यावेळी शर्मा हा सोसायटीच्या आवारात संशयास्पद फिरताना दिसला. त्याने रखवालदाराच्या ड्रॉव्हरमधून सदनिकेची चावी चोरल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून शर्माला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने शेजाऱ्यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. शेअर बाजारातील ‘ऑनलाइन ट्रेडिंग’च्या मोहात त्याने हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त राम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक मारुती पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक दीपक कारंडे, उपनिरीक्षक आकाश विटे, अभिजीत जाधव, अभिजित रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, किेशोर पवार यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *