वाशिम (प्रतिनिधी)- कष्टाला पर्याय नसतो आणि जिद्दीपुढे नशिबालाही झुकावे लागते या म्हणींचा प्रत्यय पोलीस निरीक्षक सुधाकर भाऊसिंग आडे यांच्या यशस्वी प्रवासाकडे पाहिल्यानंतर येतो. अत्यंत ग्रामीण भागातून शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या मेहनतीच्या बळावर पोलीस दलात मानाचे स्थान मिळविणाऱ्या आडे यांच्यावर वाशिमचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवून त्यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
परभणी जिल्ह्यातील मौजे हलवीरा हे जिंतूर तालुक्यातील ग्रामीण गाव,तेथे ग्रामीण वातावरणात वाढलेल्या सुधाकर आडे यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सन २००८ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे सातत्यपूर्ण परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्य निष्ठेच्या बळावर त्यांनी सेवेत उल्लेखनीय वाटचाल केली.
सन २०१३ मध्ये त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली. हिंगोली शहर, बसंबा, कळमनुरी, सोनखेड आदी ठिकाणी त्यांनी प्रभावी सेवा बजावली. त्यानंतर सन २०२१ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर नांदेड येथील भाग्यनगर पोलीस ठाणे तसेच वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर पोलीस ठाण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
१७ जुलै रोजी वाशिमचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी त्यांची आर्थिक गुन्हे शाखेतून स्थानिक गुन्हे शाखेत बदली करून महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रदीप अशोकसिंग परदेशी यांची आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
सुधाकर आडे यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेली कामगिरी म्हणजे सन २०२० मध्ये नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पाच वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीला अवघ्या काही तासांत अटक करण्याची धाडसी आणि वेगवान कारवाई. या तपासामुळे पीडितेला न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेली आणि आरोपी आजही तुरुंगात आहे.
सोन्याची कसोटी आगीतच लागते असे म्हटले जाते. विविध ठिकाणी कठीण परिस्थितीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच आडे यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेसारख्या संवेदनशील विभागाची धुरा सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. वास्तव न्यूज लाईव्हतर्फे पोलीस निरीक्षक सुधाकर भाऊसिंग आडे यांना नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 48
