![]()
प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या २५ वर्षांच्या महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोप करत नातेवाइकांनी शनिवारी (२४ जानेवारी) उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. हर्षीन हिना खालेद चाऊस (२५, रा. शहा कॉलनी, पीरबाजार, उस्मानपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, यासंदर्भात संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शहा कॉलनी भागातील रहिवासी खालेद चाऊस यांनी पत्नी हर्षीन हिना यांना २१ जानेवारी रोजी प्रसूतीसाठी उस्मानपुरा येथील छाबडा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दुपारी १ वाजता त्यांचे सिझेरियन झाले आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर रक्तस्राव थांबत नसल्याने आणि प्रकृती खालावल्याने रुग्णाला नातेवाइकांना विश्वासात न घेता घाईघाईने अन्य रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारांबाबत संशय, मृत्यूमुळे धक्का २१ तारखेपासून २३ जानेवारीपर्यंत एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. मात्र, २३ तारखेला दुपारी अचानक हर्षीन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. हॉस्पिटलमधील सिझरदरम्यान झालेली चूक आणि त्यानंतर दोन्ही रुग्णालयांनी माहिती लपवून ठेवल्यानेच हा मृत्यू ओढवल्याचा आरोप पती, नातेवाइकांनी केला. नातेवाइकांचे सवाल { सिझरनंतर रक्तस्राव सुरू झाल्यावर तातडीने योग्य उपचार का झाले नाहीत? { रुग्णाला अन्य रुग्णालयात नेताना नातेवाइकांना विश्वासात का घेतले नाही? { तीन दिवस प्रकृतीची खरी माहिती का लपवून ठेवली? मृतदेह थेट पोलिस ठाण्यासमोर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास नातेवाइकांनी हर्षीनचा मृतदेह थेट उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर आणला. या वेळी नवनिर्वाचित नगरसेवक नवनीत ओबेराय, एमआयएमचे नगरसेवक हाजी इसाक खान यांच्यासह मोठा जनसमुदाय जमा झाला होता. दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली.
प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू, मृतदेहासह नातेवाइकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या:उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप
