माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन;गुरूवारी होणार पार्थिवावर अंत्यसंस्कार
किनवट (प्रतिनिधी) :- किनवट माहूर तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार गट) माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हैदराबाद येथील ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये सकाळी पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 68 वर्षांचे होते. उद्या गुरूवारी (दि.02) सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी दहेली तांडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नूतन वर्षाची पहाट नाईक कुटुंबियांसाठी व राष्टवादीच्या शरद पवार पक्षासाठी दु:खदायी ठरली. शरद पवारांचे ते अतिशय विश्वासू अन् निष्ठावान साथीदार समजले जात. तरुणपणी ते तेलंगणातील आदिलाबाद येथे कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत. 1999 मध्ये रा.काँ.पक्षाचे मतदारसंघात प्राबल्य नसतांनाही ते रा.काँ.च्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवून पराभूत झाले. मात्र, न खचता त्यांनी पुढील पाच वर्षे संपूर्ण मतदारसंघील प्रत्येक गाव, वाडी,तांडे,पाडे,गुडे पिंजून काढीत नव्या उमेदीचे कार्यकर्ते तयार करून पक्षसंघटन मजूबत केले. त्यानंतर मात्र ते सलग तीन टर्ममध्ये 2004,2009 व 2014 मध्ये ‘हॅटट्रिक’ साधत दणदणीत विजय मिळवून आणि दखल घेण्याजोगी विकासकामे करून राष्ट्रवादीतील एक मातब्बर नेता म्हणून ते प्रकाशझोतात आले. 2019 निवडणुकीत त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला नसता तर त्यांची मंत्रीपदी नक्की वर्णी लागणार होती. अशा विपरित परिस्थितीतही त्यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपल्या हक्काच्या मतदारावरील पकड सुटू न देता सातत्याने सर्वांच्या संपर्कात राहून त्यांना प्रोत्साहित केले. राष्ट्रवादीमध्ये पक्षफुटीच्या भूकंपातही त्यांनी शरद पवारांची साथ न सोडता, निष्ठावान राहिले. त्यावेळी राज्यात खिळखिळ्या झालेल्या पक्ष संघटनेचा प्रभाव आपल्या मतदारसंघात किंचितसाही पडू न दिल्याने एकही कार्यकर्ता त्यांना सोडून गेला नाही, उलट पक्ष संघटन अधिक मजबूत केले. तत्पूर्वी त्यांना महायुतीच्या घटकपक्षांकडून आलेली ऑफरही त्यांनी धुडकावल्याचे निकटवर्तीयांकडून समजले. नुकत्याच झालेल्या 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयाची पूर्ण खात्री होती. अनेक राजकीय विश्लेषकांचा व जाणकारांचाही तसाच होरा होता. मतमोजणीतही शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहिली. मात्र, या निवडणुकीतही फार कमी फरकाने पराभव झाल्यामुळे त्यांना जबर धक्का बसून ते थोडेसे खचल्यासारखे झाले होते, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांत चर्चा होती. सदैव हसतमुख, अत्यंत मनमिळावू स्वभावाचे नाईक हे राजकारणात कुणावरही अन्याय न होऊ देता, सर्व जाती-पातीतील कार्यकर्त्यांना घेऊन चालत असल्यामुळे अतिशय लोकप्रिय होते. कार्यकर्तेही त्यांच्यावर अपार प्रेम अन् विश्वास करीत असत. एक शांत, संयमी, दिलदार, कुणाशीही वैर न नसलेला अजातशत्रू आणि राजकारणातील धोरणी अन् चाणाक्ष असे व्यक्तिमत्व काळाआड गेल्याने किनवट-माहूर तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई,नातवंड असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या गावी दहेलीतांडा येथे दर्शनासाठी ठेवणार असून, उद्या गुरूवारी (दि.02) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.
Post Views: 69