भोकर (प्रतिनिधी) – स्मृतीशेष प्रवीण वाघमारे यांच्या ११ व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट असोसिएशन, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय, भोकर येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा गरजू रुग्णांना मोठा लाभ झाला असून एकूण ४० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. साईनाथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
शिबिरात ६ अपेंडिक्स, ५ हर्निया रिपेअर, ४ हायड्रोसिल, ५ फायब्रोएडिनोमा तसेच १९ लहान गाठींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच एका लहान मुलावर फायमोसिसची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया शिबिरासाठी नांदेड येथील सर्जन डॉ. संतोष अंगरवार, डॉ. जीवन पावडे, डॉ. पांडुरंग पावडे, डॉ. भास्कर आवटी यांनी सेवा दिली. तसेच भूलरोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब बिराडे, डॉ. आशिष कदम व डॉ. अस्मिता भालके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण रुग्णालय, भोकर येथील वैद्यकीय अधिकारी, इन्चार्ज सिस्टर पवार मॅडम, सर्व नर्सिंग स्टाफ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रीनंदन पांचाळ, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, तसेच इतर आरोग्य सेवक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून अथक परिश्रम घेतले. स्मृतीशेष प्रवीण वाघमारे यांच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि मोफत उपचार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजक व वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
