सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा


नांदेड – छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील ऐतिहासिक समाधी स्थळाचा विकास करून भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली.

तामसा येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी छावा मराठा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात चर्चा केली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी तामसा परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत स्मारक उभारणीसाठी शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

यावेळी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक सल्लागार समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन व आढावा समिती स्थापन करणे, स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे तसेच प्रकल्प व्यवस्थापन समिती (पीएमसी) गठीत करण्याबाबत मागणी केली. 

शिष्टमंडळाच्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री श्री. सावे यांनी स्मारक उभारणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाच्या उभारणीस गती देण्यात येईल. तसेच यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीस किशोर चव्हाण, डॉ. राजेंद्र दाते पाटील, इंजि. तानाजी हुस्सेकर, कामाजी पवार, सुनंदा जोगदंड, डॉ. प्रभाकर जाधव, दीपक पावडे, दीपक राजुरकर, कैलास शिंदे, बबन पाटील, संजय हंबर्डे, सुनील कदम, दशरथ कपाटे, शिवानंद पाटील, विश्वजीत जाधव यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *