जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन


नांदेड –  पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण,  खासदार डॉ. अजित गोपछडे, किनवटचे आमदार भीमराव केराम,  आमदार राजेश पवार, आमदार आनंद तिडके-बोंडारकर, आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री अतुल सावे यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा नियोजन समितीमार्फत हा नाविन्यपूर्ण उपक्रम साकारण्यात आला आहे. या योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात येत आहेत.

या केंद्रांवर 60 किलोवॅट क्षमतेचे फास्ट चार्जर बसविण्यात आले असून त्याद्वारे एकाच वेळी दोन इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात ही सेवा उपलब्ध होणार असून इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार आहे.

महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अशा प्रकारे सर्व तालुक्यांमध्ये ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला असून नांदेड जिल्हा हरित व शाश्वत विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *