![]()
एका छोट्याशा चुकीचा भीषण परिणाम समोर आला असून, तालुक्यातील नांदेड येथे लागलेल्या आगीत एका कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले आहे. घरातील अन्न-धान्यासह दोन मोटारसायकल जळून खाक झाल्या असून बावनकर कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरची घटना शुक्रवारला दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सुमारास घडली आहे. नांदेड येथील रहिवासी मिथून गोपीचंद बावनकर यांच्या घरी हळद उकळण्याचे काम सुरू होते. काम आटोपल्यावर चुलीतील लाकडे विझल्याचा समज करून ती घरातील डिझेल साठवलेल्या बॅरेलजवळ ठेवण्यात आली. मात्र, त्या लाकडांमध्ये धुमसणारा विस्तव पूर्णपणे विझलेला नव्हता. काही वेळातच या विस्तवाने पेट घेतला आणि थेट ४० लिटर डिझेलच्या बॅरेलला गाठले. डिझेलच्या संपर्कामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. बॅरेलचा स्फोट झाल्याने आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढल्याने दोन मोटारसायकल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पूर्णतः जळून खाक झाल्या, यासह घरात बसविलेले फ्रिज, एसी सह वर्षभराची पोटाची बेगमी आणि शेतीतील साठा, कपडे, भांडी आणि महत्त्वाची कागदपत्रे यांचा कोळसा झाला. आगीचा तांडव पाहून संपूर्ण गाव बावनकर यांच्या मदतीला धावून आले. गावकऱ्यांनी पाण्याचा मारा करत शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बावनकर कुटुंब उघड्यावर आले आहे. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.
विझलेल्या लाकडाने पेटवला संपूर्ण संसार..!:लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथील काळजाला चटका लावणारी घटना, VIDEO समोर
