![]()
पुणे शहर आणि उपनगरांमधील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. गृह खात्याने या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी, असे या शिष्टमंडळाने म्हटले. शुक्रवारी दाते यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात पुण्यातील महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची विक्री, कोयता गँगची दहशत, टोळीयुद्ध आणि वाढत्या वाहन अपघातांकडे लक्ष वेधण्यात आले. शहरातील बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, भवानी पेठ, येरवडा, वानवडी आणि सिंहगड रस्ता यांसारख्या परिसरात कोयता गँग सक्रिय असून, वाहनांची तोडफोड आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या घटना वाढल्याचे शिष्टमंडळाने नमूद केले. पुण्यात होणाऱ्या ‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये अमली पदार्थांचा वापर वाढल्याने तरुण पिढीवर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच, शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता, अपुऱ्या पोलिस मनुष्यबळावर चिंता व्यक्त करत पोलिस दलाची संख्या वाढवण्याची सूचनाही करण्यात आली. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी निवेदन वाचल्यानंतर पुणे पोलिस आयुक्तांना दूरध्वनी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही दाते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश काकडे, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, विशाल तांबे, काका चव्हाण, मनाली भिलारे, किशोर कांबळे, प्रवीण तुपे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे गुन्हेगारी वाढली:गृह खात्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे पोलिस महासंचालकांना निवेदन
