दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद:सहा आरोपी अटकेत, 14.87 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकूण 20 गुन्हे उघडकीस




पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार हत्यारे आणि चोरीची बोलेरो जीप असा एकूण १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आणि वाहनचोरीचे एकूण २० गुन्हे उघडकीस आले आहेत. ही टोळी लोणी प्रवरा येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप कोळवाडी परिसरात वापरत असताना उघडकीस आली. वाहनमालकाच्या नातेवाईकांनी संशयितांना विचारणा केली असता वाद झाला. यावेळी ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा होताच गावकऱ्यांनी दोन आरोपींना पकडले, तर चौघे डोंगराळ भागात पळून गेले. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे सहा तास शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेनंतर उर्वरित चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. अटकेत असलेले आरोपी परभणी, पुणे, रायगड आणि इतर भागातील असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीत त्यांनी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील दोन दरोडे, एक दरोड्याचा प्रयत्न, दोन जबरी चोरी, १३ घरफोड्या आणि दोन वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या आरोपींवर यापूर्वी विविध राज्यांत ५० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस ठाणे आणि ग्रामस्थांच्या संयुक्त कारवाईत ही मोठी कामगिरी करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *