ब्रेक फेल झाल्याने एसटी बसचा अपघात:बेलापूरमध्ये 5 वाहनांचे नुकसान, 5 जण जखमी




सायन-पनवेल महामार्गावर बेलापूर उड्डाणपुलाजवळ एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी (27 सप्टेंबर) संध्याकाळी घडली. ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने पुढे जाणाऱ्या दोन कार आणि तीन ऑटो रिक्षांना धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यामध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. दोन्ही रिक्षाचालकांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात संध्याकाळी सुमारे 5.45 वाजता बेलापूर खिंड आणि उड्डाणपुलादरम्यानच्या रस्त्यावर घडला. संबंधित एसटी बस मुंबई सेंट्रल येथून रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या दिशेने प्रवास करत होती. बसमध्ये एकूण 10 प्रवासी होते. प्रवासादरम्यान अचानक बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकासमोर मोठे संकट निर्माण झाले. त्यानंतर बसने मार्गावरील वाहनांना धडक दिल्याने परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. बसच्या धडकेनंतर रिक्षा ट्रकवर आदळली या अपघाताची माहिती देताना सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लखन रासकर यांनी सांगितले की, बेलापूर खिंड आणि उड्डाणपुलादरम्यान बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने पुढे जाणाऱ्या 2 कार आणि 3 रिक्षांना धडक दिली. यावेळी बसची धडक बसलेल्या एका रिक्षेचा पुढे जाणाऱ्या ट्रकला धक्का लागला. परिणामी रस्त्यावर वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला. काही वेळानंतर एसटी बस थांबवण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली. 5 जण जखमी; 2 रिक्षाचालक गंभीर अपघातात 2 रिक्षाचालकांसह रिक्षामधील 3 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका किशोरवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना तातडीने सीबीडी बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात 2 रिक्षाचालकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तिसऱ्या रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. बसमधील सर्व 10 प्रवासी सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अपघातामुळे 2 कार आणि 3 रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसमधून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. चालकाची वैद्यकीय तपासणी होणार अपघातग्रस्त एसटी बसचा चालक सचिन टेकाम (वय 35) असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाने मद्यपान केलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. पोलीस निरीक्षक लखन रासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाची वाशी येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत मद्यपान केल्याचे आढळल्यास त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, बसचा ब्रेक नेमका कोणत्या कारणामुळे निकामी झाला, यासह अपघाताच्या इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम बेलापूर उड्डाणपुलाजवळ एसटी बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. एका रिक्षेचा ट्रकला धक्का लागल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातातील नुकसानग्रस्त वाहने आणि जखमींना रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया करण्यात आली. या घटनेत सुदैवाने एसटी बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. मात्र, 2 रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष लागले आहे. अपघातामागील तांत्रिक कारणे आणि चालकाची जबाबदारी याबाबत पोलिसांच्या तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. हेही वाचा…. थोरातांच्या गेस्ट हाऊसमध्ये राजकीय विरोधक एकत्र:जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक, सुजय विखे थेट थोरातांच्या पाया पडले अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आणणारी घटना समोर आली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राजकीयदृष्ट्या परस्परांचे विरोधक मानले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतर बैठकीच्या समारोपावेळी सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना वाकून नमस्कार करत त्यांच्या पाया पडल्याचे दृश्य समोर आले. थोरात यांनीही विखे यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना प्रतिसाद दिला. या प्रसंगाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *