प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी परिस्थितीत देशी वाणाच्या मिरचीने एकरी सव्वा तीन लाखांचे उत्पन्न, परभणीच्या कापसीतील शेतकऱ्याचा प्रयोग




सततचा दुष्काळ, हवामानातील लहरीपणा आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे सोयाबीन अन् कापसासारखी पारंपरिक पिके तोट्यात जात असताना, परभणी जिल्ह्यातील कापसी (ता. पालम) येथील शिवाजीराव पवार यांनी मात्र एक वेगळा आणि नफा मिळवून देणारा मार्ग शोधला आहे. बाजारातील महागड्या संकरित बियाण्यांच्या मागे न धावता, त्यांनी अनेक वर्षांपासून जतन केलेल्या ‘बरबडी गावरान’ या देशी वाणाचा वापर करून मिरचीचे एकरी ९ क्विंटल उत्पादन मिळवत तीन ते साडेतीन महिन्यात ३ लाख 25 हजार रुपयांचे एकूण उत्पन्न घेतले आहे. यंदा दुष्काळामुळे विहिरी व बोरवेलच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयाबीन आणि कापसाच्या उत्पन्नात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्याउलट, मिरचीच्या या देशी वाणाला संपूर्ण हंगामात केवळ ३ ते ४ नियंत्रित पाण्याचा ताण दिला तरी पीक चांगले तग धरून राहते. सोयाबीन, कापूस किंवा संकरित मिरचीसाठी दरवर्षी हजारो रुपयांचे बियाणे बाजारातून विकत घ्यावे लागते. मात्र, कापसीचे शेतकरी स्वतःच्याच शेतातील लाल मिरचीपासून घरचे ‘बरबडी गावरान’ बियाणे तयार करतात. यामुळे एका एकरामागे बियाण्यांचा होणारा मोठा खर्च पूर्णपणे वाचतो. संकरित पिकांच्या तुलनेत या गावरान वाणाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याने कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे रासायनिक औषधांच्या फवारणीचा खर्च मर्यादित राहून नफ्याचे प्रमाण वाढते. सोयाबीन किंवा कापसातून एकरी मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नाच्या तुलनेत, मिरचीच्या या पिकातून १ एकरात ५० हजार रुपये खर्च करून ९ क्विंटलच्या उत्पादनातून तब्बल ३ लाख 25 हजार रुपयांचे एकूण उत्पन्न सहज मिळते. खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात पावणेतीन लाखांचा निव्वळ नफा उरतो. विशेष म्हणजे, अवर्षणाच्या काळात पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता ‘देशी वाण आणि योग्य पाण्याचे नियोजन’ केल्यास शेती कशी फायदेशीर ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण कापसीच्या पवार यांनी घालून दिले आहे. घरबसल्या ३५ हजारांवर क्विंटलचा भाव या गावरान मिरचीची साल नाजूक आणि पातळ असली, तरी तिचा कुंकवासारखा गडद लाल रंग आणि वैशिष्ट्यपूर्ण तिखटपणा ग्राहकांसह व्यापाऱ्यांना आकर्षित करतो. मिरचीची उत्तम गुणवत्ता आणि मोबाईलद्वारे होणारा प्रचार यामुळे आता मुंबई आणि इतर ठिकाणचे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारात येऊन ३५,००० रुपये प्रति क्विंटलच्या दराने खरेदी करत आहेत. मजुरांनाही रोजगाराचा आधार केवळ शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे एवढाच या पिकाचा फायदा नसून, गावातील व परिसरातील महिला मजुरांनाही या पिकाने मोठा आधार दिला आहे. तोडणी हंगामात महिलांना दिवसाला ३०० रुपये रोख किंवा तोडलेल्या मिरचीच्या प्रमाणात (१२ ते १६ किलोमागे १ किलो) मजुरी मिळते, ज्यामुळे स्थानिक रोजगार वाढला आहे.
———————
शेतकरी मोबाइल नंबर : 8329070501

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *