![]()
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची एकच धावपळ उडवून दिली. गुलाबी थंडी अनुभवत असलेल्या मुंबईकरांना सकाळपासूनच हवामानातील या बदलाचा फटका बसला. दक्षिण मुंबई परिसरात तुलनेने जोरदार पावसाने हजेरी लावली, तर उपनगरा
.
भारतीय हवामान विभागानुसार, अरबी समुद्रातून येणारे आर्द्र वारे आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या थंड हवामानाच्या प्रभावामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. याच कारणामुळे नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत पावसाचा जोरदार सडाका अनुभवायला मिळाला. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतात सध्या थंडीची लाट सक्रिय असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. त्याचबरोबर दक्षिणेकडे तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या बदलत्या हवामानाचा प्रभाव राज्यातील तापमानावर पुढील काही दिवस दिसून येणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किमान तापमानात तात्काळ मोठा बदल होणार नसला, तरी त्यानंतर तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव जाणवत राहणार असून, त्यानंतर तापमानात पुन्हा घट होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागांत नोंदवलेल्या किमान तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता थंडीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. अहिल्यानगरमध्ये 12.3, जळगावमध्ये 9.2, कोल्हापुरात 17.1, महाबळेश्वर आणि पुण्यात प्रत्येकी 13.5, सांगलीत 16.4, सोलापुरात 18.2, छत्रपती संभाजीनगरमध्ये 13.8, धाराशिवमध्ये 12.4, अकोल्यात 15, अमरावतीत 14.5, बुलढाण्यात 15.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. मुंबईत 20.6 तर सांताक्रूज परिसरात 19.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं आहे.
विदर्भ आणि मराठवाडा विभागात मात्र गारठ्याचा कडाका अधिक तीव्र झाल्याचं चित्र आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात यंदाचा डिसेंबर गेल्या काही वर्षांतील सर्वात थंड ठरल्याची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांपासून अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जात असल्याचं दिसून आलं आहे. पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याची शक्यता असून, तापमानात 1 ते 2 अंशांनी किरकोळ वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील काही भागांत किमान तापमानात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. परभणीमध्ये सर्वात कमी 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर धुळे जिल्ह्यात तापमान 7 अंशांपर्यंत खाली घसरलं होतं. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, पुढील काही दिवसांत तापमान 1 ते 2 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
एकीकडे मुंबईत नववर्षाच्या स्वागताला पावसाने हजेरी लावली असताना, दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्रात गारठा अधिकच वाढल्याचं चित्र आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. थंडी, ढगाळ वातावरण आणि संभाव्य तापमान बदल यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील हवामान सतत बदलत राहील, असा अंदाज असून, हवामान खात्याच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
