प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक:संतोष कनोजिया उर्फ टल्लीसह हेल्मेटधारी आरोपी पोलिसांच्या ताब्यात




ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-5 आणि खंडणीविरोधी पथकाने प्रयागराज येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत एका अज्ञात हेल्मेटधारी आरोपीला देखील पोलिसांनी पकडले आहे. ठाणे क्राइम ब्रँचने ही कारवाई केली. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष कनोजिया हाच या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या हत्येमागील नेमका उद्देश आणि कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पाच हल्लेखोरांकडून गोळीबार ठाण्यात 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी पिस्तुलातून सात राऊंड फायर केले, त्यापैकी चार गोळ्या पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. घटनेनंतर त्यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांकडून हत्येच्या कटाचा आरोप प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत तपास यंत्रणांकडून अधिकृत निष्कर्ष समोर येणे बाकी आहे. दरम्यान, हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली असून, आतापर्यंत काही आरोपींना अटक करण्यासोबतच वाहनांचीही जप्ती करण्यात आली आहे. हत्येच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ 9 ऑक्टोबर रोजी ठाण्यात विरोधकांकडून शांततापूर्ण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयापासून पोलीस आयुक्तालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आक्रमक भूमिका मांडली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *