[ads1]
![]()
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयाचा 14 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते किरणोपचारशास्त्र विभागांतर्गत ‘हॉस्पिटल बेस्ड कॅन्सर रजिस्ट्री’ या नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यामुळे आगामी काळात कॅन्सर रुग्णांची अद्ययावत नोंद ठेवली जाईल. विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले की, कॅन्सरचे वेळेवर निदान आणि उपचार केल्यास 100 टक्के यश मिळते. त्यांनी लोकांना कॅन्सरला घाबरू नका, असे आवाहन केले. या कार्यक्रमात कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांचा (‘कॅन्सरयोद्धे’) सत्कार करण्यात आला. रुग्णांनी सांगितले की, कॅन्सरचे नाव ऐकताच सर्व संपले असे वाटले होते, पण डॉक्टरांच्या वेळेवर उपचारांमुळे आम्ही या आजाराला हरवले. रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घरच्यासारखा धीर देतात, असेही महिला रुग्णांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी रुग्णालयाच्या सुविधा विस्ताराबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रुग्णालयाची क्षमता आता 100 वरून 300 इतकी वाढली आहे. पूर्वी मुंबईला जाणारे रुग्ण आता इथेच उपचार घेत आहेत. लवकरच येथे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’, स्वतंत्र रक्तपेढी आणि मॉलिक्युलर लॅब सुरू करण्यात येणार आहे. डॉ. गायकवाड यांनी आरोग्यदायी सल्लाही दिला. त्यांनी बैठे काम करणाऱ्यांना रोज तासभर चालणे, बाहेरचे तिखट-चमचमीत पदार्थ टाळून घरगुती ताजे अन्न खाणे आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला. वजन अचानक कमी होणे किंवा अंगावरील तिळाचा आकार बदलल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
[ads2]
वेळेवर उपचार केल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होतो:डॉ. अरविंद गायकवाड यांचा सल्ला; शासकीय कर्करोग रुग्णालयाचा वर्धापन दिन साजरा
















Leave a Reply