गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का:वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात 'ऑपरेशन लोटस'; धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश




गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. धानोरा नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी तब्बल १३ जागा जिंकत काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते. मात्र, एकाच वेळी ९ नगरसेवक फुटल्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक नेतृत्वाला आणि काँग्रेस पक्षाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. ९ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसकडे आता केवळ ४ नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे धानोरा नगरपंचायतीवरील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली असून भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक उपनगराध्यक्ष ललित बरछा यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम यांच्यासह ललित बरछा, भूषण उंदीरवाडे, माणिक मडावी, कालिदास मोहुर्ले, नरेश चिमूरकर, सुषमा भुरसे, सीमा काटेंगे, ,यामिना पेंदाम या नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? या पक्षप्रवेशाबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत पक्षात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या सहभागामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि जनतेच्या विकासासाठी नव्या जोमाने कार्य करण्यास निश्चितच बळ मिळेल,” असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपची ताकद वाढली दरम्यान, या मोठ्या राजकीय फेरबदलामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एकेकाळी काँग्रेसचा भक्कम गड मानल्या जाणाऱ्या धानोरा नगरपंचायतीवर आता भाजपने ताबा मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर काँग्रेसच्या गोटात चिंतेचे सावट पसरले आहे. हे ही वाचा 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल शब्द नाही:पोलिसांच्या अत्याचारावर मौन, नुकसानभरपाईचे काय? प्रधानांच्या राजीनाम्यावर आंबेडकरांची टीका ‘नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, त्यांनी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी या निर्णयाची घोषणा करत राजीनाम्यामागील भूमिका मांडली. दरम्यान, या राजीनाम्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत, “प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल ओतण्याचे काम केले असून, कधीही न झुकणाऱ्यांना आता जनतेसमोर नाक रगडावे लागले आहे,” असा घणाघाती टोला लगावला आहे. सविस्तर वाचा… ‘जेनझी’ने सरकारच्या झिंज्या उपटल्या:उद्याचा तिरंगा मार्च होणारच, शिवाजी पार्कवर तरुणांचा विजयोत्सव साजरा करू – ठाकरे बंधू ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि गृहखात्यावर घणाघाती हल्ला चढवला. “हा देशभरातील तरुणाईचा आणि ‘जेनझी’चा ऐतिहासिक विजय असून, त्यांनी मस्तवाल सरकारच्या झिंज्या उपटून त्यांना जमिनीवर आणले आहे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर, “पोलिसांच्या अत्याचारावर कारवाई झाली नाही, तर आता तरुणाईचा मोर्चा गृहमंत्री अमित शहांकडे वळल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *