नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड-तुळजापूर महामार्गावरील विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने पाठवलेल्या तीन सदस्यांच्या विशेष पथकाने नुकतीच या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
श्री गुरु गोविंद सिंघ जी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर असलेल्या या उड्डाणपुलाचा भाग कोसळल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्याच सुमारास ही दुर्घटना घडली. यामुळे ही घटना नैसर्गिक आपत्ती होती की मानवी चूक, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. स्थानिक नागरिकांनी कंत्राटदाराच्या कामावर ताशेरे ओढले असून, कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे किंवा तांत्रिक त्रुटीमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. काही जण याला देवाची करणी असेही संबोधत आहेत.सर्वात छान म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही.
काल नांदेडमध्ये दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने पुलाच्या पडलेल्या भागाची बारकाईने पाहणी केली आणि आवश्यक ती माहिती संकलित केली. पाहणी पूर्ण झाल्यानंतर या पथकाने सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. मात्र, पुलाच्या दुर्घटनेचे नेमके कारण काय, याबद्दल पथकाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
चौकशी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या पाहणीचा सविस्तर अहवाल थेट केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे.आम्ही आमचा अहवाल जेव्हा सादर करू, तेव्हाच तो सर्वसामान्य जनतेसाठी खुला होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या अहवालानंतरच या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई होईल आणि पुलाच्या दुरुस्तीची पुढील दिशा काय असेल, हे स्पष्ट होणार आहे. सध्या तरी या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे.

Post Views: 334
