रांजोना शिवारातील खूनाला अवघ्या दोन तासांत वाचा फुटली:लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे स्पष्ट, हट्टा पोलिसांनी आरोपी घेतला ताब्यात




वसमत तालुक्यातील रांजोना शिवारातील एका शेतात तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळताच हट्टा पोलिसांच्या पथकाने गुरुवारी ता. १५ सकाळी सात वाजता घटनास्थळ गाठले. परिस्थितीजन्य पुरावे व इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासातच खुनाला वाचा फोडली. या प्रकरणी मयताच्या लहान भावाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील रांजोना शिवारातील एका शेतात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हट्टा पोलिसांना डायल ११२ वरून मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार संदीप सुरोशे, गणेश सुर्यवंशी, ताम्रध्वज कासले, शेख हकीम, प्रितम चव्हाण यांच्या पथकाने सकाळी सात वाजता घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवली. सदर मृतदेह रांजोना येथील नवनाथ साळवे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या डोक्यात दगडाने वार करून त्यांचा खून केल्याचे दिसून आले. या प्रकरणी हट्टा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणत असतांनाच आरोपींची माहिती घेण्यात सुरवात केली. त्यासाठी पोलिसांनी रांजोना गावात माहिती घेतली. यामध्ये पोलिसांनी मयत नवनाथ याचा लहान भाऊ गजानन साळवे याची प्राथमिक चौकशी केली. मात्र पोलिसांच्या चौकशीमध्ये गजाननचे बिंग उघडले पडले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली अन अवघ्या दोन तासात खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी आरोपी गजानन यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *