![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा धडाकेबाज प्रचार मंगळवारी थंडावला असून, आता संपूर्ण मुंबई मतदानाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शब्दयुद्ध’ छेडले आहे. एकीकडे मनसे
.
बाळा नांदगावकरांची पोस्ट काय?
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर एक अत्यंत भावुक आणि राजकीयदृष्ट्या सूचक पोस्ट शेअर केली आहे. बाळा नांदगावकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो. उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त 2 मिनिटे शांत चित्ताने विचार करा की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. यावेळी मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही. ठाकरेंना जर सत्तेसाठी एकत्र यायचे असते तर ते कधीच आले असते. पण केवळ आपल्या माय मराठी साठी आपल्या महाराष्ट्र धर्मा साठी ही लढाई किती महत्त्वाची आहे हे जाणून ते नेक इराद्याने एक आले आहे.
समोरील विरोधक बलाढ्य, धनदांडगे, सत्ताधारी असले तरी आपण एकीने , ठाकरेंच्या बरोबरीने लढलो तर आपण त्यांना हरवू शकतो. माझ्या एका मताने काय होईल असा विचार न करता मी अजून किती जणांना सांगू शकतो ते बघा आणि सर्व ताकद आपल्या माणसांसाठी लावा. ही विनंती केवळ मुंबईतील नागरिकांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आहे.
रात्र वैऱ्याची आहे पण या अंधार रात्री नंतर जी आशेची किरण घेऊन येणारी सकाळ आहे ती सोनेरी आहे. मी महाराष्ट्रासाठी खारीचा वाटा उचलत आहे, तुम्हीही पुढे या.
संजय राऊतांचा ‘ठाकरे ब्रँड’वर विश्वास
दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला जय महाराष्ट्र असे कॅप्श्न दिले असून, सर्व मराठी माणसांचे ठरलंय, एक आहे तर सेफ आहे! आणि ठाकरेच बेस्ट आहे! असा संदेश देत, मराठी मतदारांना भावनिक साद घातली आहे.
नीतेश राणेंचा पलटवार : “हिंदूंच ठरलंय!”
एकीकडे ठाकरे गट आणि मनसेकडून मराठी माणसाला एकत्र येण्याचे आवाहन होत असताना, भाजप आमदार नीतेश राणे यांनी याला ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्याने प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर “हिंदूंच ठरलंय, आय लव्ह महादेवच…” असा मजकूर असलेली पोस्ट शेअर केली आहे. नीतेश राणे यांनी या पोस्टद्वारे मुंबईकरांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता मुंबईकर कोणाच्या पारड्यात आपले दान टाकणार, हे उद्या स्पष्ट होईल.
