![]()
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर अचानक शेजारील पडक्या घराची भिंत कोसळली. या भीषण दुर्घटनेत भिंतीखाली दबून या बालिकेचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतीक्षा मुकेश राऊत असे या मृत बालिकेचे नाव आहे. सोमवारी (दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास) घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण खामखुरा गावावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांकडे आली होती प्रतीक्षा मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ही मूळची कोरंभी येथील रहिवासी होती. तिचे आई-वडील मोलमजुरी आणि शेतीची कामे करून आपला उदरनिर्वाह चालवतात. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने, कामाच्या निमित्ताने हे कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे खामखुरा येथे आले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर अचानक हा घाला घातला. पावसामुळे खचली होती भिंत सोमवारी दुपारी प्रतीक्षा नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात खेळण्यात दंग होती. याच अंगणाला लागून विलास नेवारे यांचे एक जुने आणि पडके घर आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने, या पडक्या घराची भिंत पूर्णपणे ओली आणि आतून कमकुवत झाली होती. चिमुकली खेळत असतानाच अचानक ही धोकादायक भिंत मोठ्या आवाजासह थेट तिच्या अंगावर कोसळली. माती आणि विटांच्या ढिगाऱ्याखाली प्रतीक्षा दबली गेली आणि यातच तिचा जागीच प्राणज्योत मालवली. पोलिसांकडून पंचनामा सुरू भिंत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून आणि कुटुंबीयांचा आक्रोश पाहून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांनी तत्काळ अर्जुनी मोरगाव पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मृतदेहाचा पंचनामा केला. सध्या या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे ग्रामीण भागात पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या जुन्या आणि पडक्या घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अशा धोकादायक वास्तूंचे सर्वेक्षण करून वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हेही वाचा.. अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग:3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. त्यानंतर धूर पसरला. त्यावेळी NICU मध्ये 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. सविस्तर वाचा
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
