![]()
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासोबतच्या वादाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. मी पोलिंग स्टेशनवर जाणे अयोग्य होते, तर हरिभाऊ राठोड तिकडे कशासाठी गेले होते? ते तिकडे पूजा करण्यासाठी गेले होते क
.
मुंबई महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. या निमित्ताने स्थानिक राजकारण चांगलेच तापले असताना एका पोलिंग स्टेशनवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर नार्वेकरांनी राठोड यांचे पोलिस संरक्षण काढून घेण्याचे आदेश सहपोलिस आयुक्तांना दिले. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर नार्वेकरांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली आहे.
मी नियमात राहूनच तिकडे गेलो होतो
राहुल नार्वेकर म्हणाले, आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील नगरसेवकांसोबत जाऊन अर्ज भरला. मी पण कुलाब्याचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मी सुद्धा माझ्या भागातील नगरसेवक व उमेदवारांसोबत जाऊन त्यांचा फॉर्म भरणे हे स्वाभाविकच आहे. कारण, आपला आमदार आपल्यासोबत यावा हे उमेदवारांनाही अपेक्षित असते. त्यानुसार मी तिकडे गेलो होतो. निवडणूक आयोगाचा नियम आहे की, एका उमेदवारासोबत 2 प्रतिनिधी जाऊ शकतात. त्यानुसार नियमात राहूनच मी तिकडे गेलो होतो.
तेथून परत येताना काही माजी विधानपरिषद सदस्य व त्यांच्यासोबत आलेली टोळी यांनी मला घेराव घालणे, धक्काबुक्की करणे, स्वतःला दिलेल्या सुरक्षेचा गैरवापर करून वातावरण तंग करणे हा कोणता प्रकार आहे? लोकप्रतिनिधी म्हणून कुणी आपल्याला मिळालेल्या सुरक्षेचा गैरवापर करत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन त्यासंबंधी कारवाई करण्याची सूचना करणे हे माझे कर्तव्य आहे.
हरिभाऊ तिकडे पूजा करण्यासाठी गेले होते का?
नार्वेकर पुढे म्हणाले, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की, मतदान केंद्रावर मी जाणे अनुचित होते, तर ते हरिभाऊ राठोड तिकडे कशासाठी गेले होते? ते तिकडे पूजा करण्यासाठी गेले होते का? आम्ही जे कार्य करतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मर्यादेत राहूनच करतो. आम्हाला संविधानाचा अत्यंत मान सन्मान आहे. म्हणूनच या संविधानातील तरतुदींचा भंग कुठेही होईल असे कार्य आमच्याकडून कधीच होणार नाही.
या प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्हाला विधानसभा अध्यक्षांना कुणी घेराव घातला? हे दिसून येईल. कोण त्याच्यासोबत वाद घालत होते, कोण त्या ठिकाणी आम्ही येथून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही, तुम्हाला हलू देणार नाही हे कोण बोलत होते. हे थोडे व्हिडिओत पाहा. त्यात सर्वकाही स्पष्ट होईल, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
नेमका काय झाला होता वाद?
कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या कार्यालयात आले होते. त्या वेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि नार्वेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात नार्वेकर हे राठोड यांच्याशी अत्यंत आक्रमक भाषेत बोलताना दिसत आहेत. माझ्या कार्यालयात येऊन बसता आणि चार कामे करून घेता. जर तुम्हाला सहकार्य करायचे नसेल तर सुरक्षा मिळणार नाही, अशी तंबी नार्वेकर यांनी राठोड यांना दिली.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी थेट मुंबईच्या सहपोलिस आयुक्तांना फोन लावून हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा आताच्या आता काढून घ्या, हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे, असे बजावले. राठोड यांनी नार्वेकरांवर इतर उमेदवारांना धमकावून त्यांच्यावर राजकीय दबाव आणल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
