Shakambhari Purnima Fruits Vegetables Decorate Pune Datta Mandir | दत्तमंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त फळ-भाज्यांची आकर्षक आरास: 51 प्रकारच्या फळांनी आणि भाज्यांनी सजले मंदिर, भाविकांची गर्दी – Pune News


पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त फळे आणि भाज्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजित या विशेष सजावटीमुळे मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

.

या आरासात मटार, पालक, गाजर, मुळा, टोमॅटो, बटाटे, कणीस यांसारख्या शाकभाज्यांसह द्राक्ष, डाळिंब, संत्रे, खरबूज, कलिंगड आणि सफरचंद यांसारख्या अनेक फळांचा वापर करण्यात आला. श्री दत्त महाराजांना भाज्यांचा सुरेख हार परिधान करण्यात आला होता, तर मंदिरातील खांब विविध प्रकारच्या भाज्यांनी सजवले होते. विविधरंगी फळांचे तोरण आणि कळसापासून पायथ्यापर्यंत लावलेला ऊस असे मनोहारी दृश्य भाविकांना पाहायला मिळाले. कलिंगडावर कोरलेल्या नक्षीदार मूर्ती मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह अनेकांना झाला.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे ५१ प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करून ही आरास साकारण्यात आली. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे उपस्थित होते. उद्योजक अतुल साखरपे, अनुष्का साखरपे, आर्या साखरपे आणि ओम साखरपे यांच्या हस्ते सकाळी दत्तयाग पार पडला.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की, प्राचीन काळी पृथ्वीवर दुष्काळ पडला असताना ऋषीमुनींनी देवीची आराधना केली होती. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन दुष्काळ दूर केला आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदू लागली. त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते. आजच्या पिढीला या माहितीची जाणीव व्हावी, या उद्देशाने ही आरास करण्यात आली आहे.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह कळसापासून पायथ्यापर्यंत शंभर भारे ऊसाची आरास करण्यात आली आहे. कलिंगडमध्ये नक्षीकामाने साकारलेल्या श्री दत्त महाराज, श्री शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच भाज्यांची आगळी-वेगळी रांगोळी पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. ही सजावट रविवार, ४ जानेवारीपर्यंत दिवसभर भाविकांना पाहण्यासाठी खुली राहणार असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *