Manchar Nagar Panchayat Election Tie Slip Draw Shiv Sena BJP | मंचर नगरपंचायतची पहिली निवडणूक ठरली ऐतिहासिक: दोन उमेदवारांना समसमान मते, चिमुकल्याच्या हातातील चिठ्ठीने शिंदे गटाला लॉटरी – Pune News



पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याचे आर्थिक केंद्र असलेल्या मंचर नगरपंचायतीची यावर्षी झालेली पहिलीच निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदारांनी असा काही कौल दिला की, प्रशासनापासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एक

.

मंचर नगरपंचायतीच्या या पहिल्या निवडणुकीत प्रभाग 3 मधील लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. राज्यात महायुती असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिंदे सेनेकडून लक्ष्मण मारुती पारधी तर भाजपच्या ज्योती संदीप बाणखेले यांच्यात अटीतटीचा सामना झाला. दोघांनीही जोरदार जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर मतदारांना साद घातली होती.

मोजणी केंद्रावर श्वास रोखणारी स्थिती

मतमोजणीच्या दिवशी प्रभाग 3 ची मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. शेवटची फेरी संपल्यानंतर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आकडेवारी समोर ठेवली, तेव्हा सर्वच अवाक झाले. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 223 मते मिळाली होती. एका मताचाही फरक नसल्याने मोजणी केंद्रावर काही काळ शांतता पसरली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पुन्हा मोजणी करण्यात आली, मात्र आकडा तोच राहिल्याने पेच निर्माण झाला.

चिमुकल्याने ठरवला लोकप्रतिनिधी

निवडणूक नियमावलीनुसार, जेव्हा दोन उमेदवारांना समान मते पडतात, तेव्हा चिठ्ठी टाकून विजयी उमेदवाराची घोषणा केली जाते. त्यानुसार लक्ष्मण पारधी आणि ज्योती बाणखेले यांच्या नावाची चिठ्ठी तयार करण्यात आली. मोजणी केंद्रातील एका निष्पाप लहान मुलाला बोलावून त्याला एक चिठ्ठी उचलण्यास सांगण्यात आले. दोन्ही उमेदवारांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्या मुलाने उचललेल्या चिठ्ठीतून जेव्हा ‘लक्ष्मण मारुती पारधी’ हे नाव बाहेर आले, तेव्हा शिवसेनेच्या गोटात आनंदाचे उधाण आले.

जिल्हाभरात ‘लकी’ विजयाची चर्चा

विजयी घोषित झाल्यानंतर लक्ष्मण पारधी अत्यंत भावूक झाले होते. “मतदारांनी तर मला पसंती दिलीच होती, पण देवानेही आता माझ्यावर विश्वास दाखवला आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मंचरच्या राजकीय इतिहासात चिठ्ठीने नगरसेवक ठरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण जिल्हाभर या ‘लकी’ विजयाची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *