वनपट्टेधारकांना सातबारा, ग्रामस्थांना विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वाटप:हरणबारीत सेवा संकल्प अभियानात आमदार बोरसेंनी जाणून घेतल्या समस्या‎




आदिवासी वनपट्टेधारकांसह ग्रामस्थांना विविध शासकीय सेवांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळावा, यासाठी हरणबारी येथे सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. ‘राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता’ या पंधरवड्यानिमित्त आयोजित या अभियानात सातबारा उताऱ्यांसह विविध महसुली नोंदी, प्रमाणपत्रे आणि वाहन परवान्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी सांगितले. बागलाण प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभियानात महसूल, कृषी, वन, मोटार वाहन आणि भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार बोरसे यांनी केले. अभियानात सातबारा, सहा-अ, फेरफार नोंदी, जात, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे आणि वाहन परवान्यांचे वाटप करण्यात आले. आमदार बोरसे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. तालुक्यातील भावनगर येथे मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी अभियानाचा पुढील टप्पा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली. या वेळी बागलाणचे प्रांताधिकारी महेश शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेखर पाटील, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, गटविकास अधिकारी अतुल पाटील, मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रतीक्षा चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रवीण पवार, शरद भामरे, पोपट ठाकरे, सुनील गवळी, काशिनाथ गवळी, ममता अहिरे, किशोर जाधव, नंदू चौरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *