![]()
अमरावती येथील लक्ष्मीनगर परिसरात आज, बुधवारी सकाळी पावसाच्या पुराच्या पाण्यात पाच महिन्यांच्या बालकाचा मृतदेह वाहून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. अर्भक नेमके कुठून वाहून आले, त्याची ओळख काय आहे आणि मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. परिसरातील बेपत्ता बालकांची माहिती, सीसीटीव्ही फुटेज तसेच नाल्यालगतच्या भागातील परिस्थितीचीही पडताळणी केली जात आहे. नाल्यात अर्भकाचा मृतदेह दिसताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ डायल ११२ वर माहिती दिली. माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले.
नाल्यात पाच महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला:अमरावतीत खळबळ, गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू
