सोनम वांगचुक यांच्या जीवाला बरेवाईट झाल्यास देशाची बेअब्रू होईल:राजू शेट्टींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात, विलासराव-मुंडेंच्या 'त्या' बैठकीचा मोठा खुलासा




स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून केंद्र सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची सरकारने अद्याप दखल न घेतल्याने, शेट्टी यांनी एका सविस्तर फेसबुक पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या निमित्ताने त्यांनी 2011 सालच्या अण्णा हजारे यांच्या जन लोकपाल आंदोलनातील तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संवेदनशील कार्यपद्धतीची मोठी आठवण सांगितली आहे. देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षेतील पेपरफुटीमुळे आतापर्यंत तब्बल 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक हे दिल्लीत गेल्या 17 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून या उपोषणाची साधी दखलही घेण्यात आलेली नाही. याच असंवेदनशीलतेवर बोट ठेवत राजू शेट्टी यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये 2011 मधील घटना आणि सद्य:स्थिती यांची तुलना करत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. 2011 च्या आंदोलनाची आठवण राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 2011 साली जेव्हा अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी ‘जन लोकपाल विधेयकासाठी’ रामलीला मैदानावर उपोषण केले होते, तेव्हा सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे, सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि इतर विरोधी नेत्यांनी संसदेत मोठा आवाज उठवला होता. विलासराव आणि मुंडेंचा समन्वय उपोषणाच्या चौथ्थ्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा निरोप घेऊन तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख हे थेट गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 2 तास सविस्तर चर्चा झाली. यावेळी सध्याचे केंद्रीय मंत्री आणि तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशीही फोनवरून चर्चा करण्यात आली. विलासराव देशमुखांनी तिथूनच दोन वेळा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन लावून दिला होता. …म्हणून अण्णांची माघार पुढील 8 दिवस विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत कुशल समन्वयकाची भूमिका बजावली. सरकारने ‘संसद संकल्प’ एकमताने मंजूर केल्यानंतर 28 ऑगस्ट 2011 रोजी अण्णांनी उपोषण सोडले आणि विलासरावांचा ‘सृजन प्रशासक’ म्हणून गौरव केला. पंतप्रधान मोदींवर घणाघात आज वांगचुक 17 दिवस उपोषणाला बसले असताना, भाजपमध्ये मनमोहन सिंग किंवा विलासराव देशमुख यांच्यासारखा एकही संवेदनशील नेता उरलेला नाही, अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली. 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनेही पंतप्रधान मोदींना पाझर फुटत नाही. अण्णांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन सत्ता मिळवणारे मोदी आता सर्व भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेऊन सोज्वळपणाचा आव आणत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवून सोनम वांगचुक यांचे उपोषण थांबवावे, अशी आग्रही मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. जर वांगचुक यांच्या जीवाला काही बरेवाईट झाले, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींची ओळख एका पुरस्कार विजेत्या व्यक्तीचा ‘हत्यारा’ म्हणून होईल आणि देशाची जगभरात मोठी बेअब्रू होईल, असा थेट आणि गंभीर इशारा शेट्टी यांनी दिला आहे. दुर्दैवाने तसे घडल्यास देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असेही ते म्हणाले. हेही वाचा.. शेतकऱ्यांची पाटी कोरी करणार!:48 हजार कोटींचे जुने वीज बिल माफ; कर्जमाफीनिमित्त सत्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजासाठी आणखी दोन अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंतच्या कृषी पंपांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच, लवकरच राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *