Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: Heated Debate in Ward 20 Talk Show | लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा: कोरोना काळात उद्धव ठाकरे घरात, शिंदे जनतेत होते, ‘महापौर आमचाच’ ठाकरे गटाचा निर्धार, भाजपने सत्ता येण्याचे स्वप्न बघावे, महापौरपदावरून ठाकरे गटाचा टोला – Chhatrapati Sambhajinagar News


छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठी डिजिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची , मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला उदंड प्रतिसाद मिळतोय. या टॉक शोचे प्रभाग क्रमांक 20 मध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय आ

.

टॉक शोमध्ये ठाकरे गट आणि महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होत आहे. कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून कारभार करत होते, तर आमचे नेते एकनाथ शिंदे थेट जनतेमध्ये जाऊन काम करत होते, असा आरोप शिवसेना (शिंदे गट) नेते सोनवणे यांनी केला.

महापौर केवळ उद्धव ठाकरे गटाचाच

यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे पदाधिकारी देशमुख यांनी, “छत्रपती संभाजीनगर मनपेत महापौर केवळ उद्धव ठाकरे गटाचाच होईल. भाजपचा महापौर होईल, हे फक्त भाजपचे स्वप्न आहे,” असा जोरदार टोला लगावला. संबंधित प्रभागातील नगरसेवक अपक्ष निवडून आले असून त्यांनी बंडखोरी केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर वातावरण अधिक तापले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी, “तुम्ही आमचा संपूर्ण पक्षच फोडला,” अशा घोषणा देत निषेध नोंदवला.

दरम्यान, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील आरोग्य केंद्रांची दुरवस्था उघड करत तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर महायुतीकडून, ज्या भागात आरोग्य केंद्र नाहीत त्या ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ठाकरे गटाच्या नेत्यांना आरोग्य केंद्रांची माहितीच नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

पृथ्वीराजनगरकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

पृथ्वीराजनगर भागाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी, आम्ही कार्यकर्ता म्हणून स्वखर्चाने रस्ते विकसित केल्याचे सांगितले. सर्व रस्ते सिमेंटचे झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा व रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे होणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला. या मुद्द्याचे शिवसेना-भाजपकडून स्वागत करत, पाणीपातळी वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे महायुतीने स्पष्ट केले.

माजी नगरसेविका साधना सुरडकर यांनी सहकार बँक कॉलनीतील ओपन स्पेसमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या राबवलेल्या प्रयोगाचा दाखला देत, प्रत्येक मोकळ्या जागेत असे उपक्रम राबविल्यासच भूजलपातळी वाढू शकेल, असे मत व्यक्त केले.

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभाव

QuoteImage

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटाचे पदाधिकारी रोहन आचलीये यांनी, प्रत्येक प्रभागात महापालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्यक असल्याचे सांगितले.

QuoteImage

QuoteImage

माजी महापौर त्रिंबक तुपे यांनी, येत्या कार्यकाळात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून शहरात सुमारे 100 सार्वजनिक शौचालये उभारली जाणार असल्याची माहिती दिली. या प्रभागातील अनेक विकासकामे स्वतःच्या माध्यमातून करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

QuoteImage

पाण्याचा प्रश्न निकाली काढू

गेल्या 15 वर्षांत महानगरपालिकेत महायुतीची सत्ता असल्याचे नमूद करत तुपे यांनी, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निधीतून परिसरात विविध विकासकामे करण्यात आल्याचे सांगितले. पाण्याचा प्रश्न येत्या दोन ते तीन महिन्यांत मार्गी लागेल, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पाणीपुरवठ्याच्या अडचणी सोडवल्या जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जुन्या शहरातील काही भागांतील पाण्याचा प्रश्नही दोन महिन्यांत निकाली काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवारच नाहीत…

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केलेल्यांनाही रोहन आचलिया यांनी डिवचले. तिकडे गेले आहात, तिकीट मिळाले नाही तरी तिकडेच रहा. निवडणुकीपुरते इकडे-तिकडे येऊ नका, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. आचलिया यांच्या आरोपांना महायुतीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले. तुमच्याकडे उमेदवारच नाहीत. कुणी नाराज झाले की त्यालाच उमेदवारी देण्यावर तुमची भिस्त आहे. मात्र, आमचे कार्यकर्ते निष्ठावान आहेत, काहीही झाले तरी पक्ष बदलणार नाही, असा प्रतिहल्ला ठाकरे गटावर करण्यात आला. त्यामुळे प्रभाग 20 मधील राजकीय लढत अधिकच रंगतदार होताना दिसत आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न…

प्रभाग क्रमांक 20 मधील महिलांनी सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. गुळगुळीत रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढत असून स्पीड ब्रेकर नसल्याने मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते चांगले आहेत, पण सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकर गरजेचे आहेत. पोलिस गस्त वाढवून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी महिलांनी केली.

दिवसाआड पाणी द्या…

प्रभागातील समस्या येथेच थांबत नाहीत. शिवशंकर कॉलनी परिसरात 8 ते 12 दिवसांनी पाणी येते. एवढे दिवस पुरेल इतका पाणीसाठा करण्याची आमच्याकडे सोय नाही. किमान एक दिवसाआड तरी पाणी मिळावे, अशी मागणी नागरिकांनी मांडली. न्यू बालाजी नगर, बौद्ध नगर, उत्तम नगर या भागांत अरुंद रस्ते आणि पार्किंगची मोठी समस्या आहे. मयूरबन कॉलनीत अरुंद पूल, घंटागाडी न येणे, कचरा उचलण्यात होणारी दिरंगाई अशा तक्रारीही नागरिकांनी केल्या. शंभुनगरचे मतदान चालते पण आम्हाला पाणी दिले जात नाही, आता प्रशासकाकडून आमच्याकडे लक्ष दिले जात नाही, असे म्हणत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.

सांडपाणी, कचरा, ओपन स्पेस…

प्रभागात अनेक ठिकाणी उघडे सांडपाणी, जागोजागी कचरा, सार्वजनिक शौचालयांची कमतरता आणि विकसित न झालेल्या ओपन स्पेस ही देखील मोठी डोकेदुखी ठरत आहे. तब्बल दहा वर्षांनंतर 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांकडे पाहताना आमच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणारा व्यक्तीच नगरसेवक व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

अभ्यासिका, जिम उभारणी…

दरम्यान, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाणीप्रश्नावर आश्वासन दिले. येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांत शहराला मुबलक पाणी मिळणार आहे. पाइपलाइनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. विरोधकांनी मांडलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. तरुणांनीही आपल्या अपेक्षा मांडल्या. परिसरात अभ्यासिका उभारावी. पोलिस व लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी जिम सुरू करावे, अशी मागणी एका तरुणाने केली. माजी नगरसेविका साधना सुरडकर यांनी सिमेंट रस्त्यांसोबतच ओपन स्पेसमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी मनपाने पुढाकार घ्यावा, असे मत मांडले.

अशी आहे प्रभागाची व्याप्ती…

छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 20 मध्ये सिंधी कॉलनीचा काही भाग, बालाजीनगर, टिळकनगर, उल्कानगरीचा काही भाग, जयविश्वभारती कॉलनी, शिवशंकर कॉलनी, बौद्धनगर, उत्तमनगर, चेतनानगर, गादिया विहारचा काही भाग येतो. नागरिकांना येथून चार नगरसेवक निवडून द्यावे लागतील. येथे एससी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण सुटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *