नांदेड(प्रतिनिधी)- येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर भूगोल विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने भूगोल अभ्यास मंडळ मंडळाचे उद्घाटन व भूगोलाच्या शोध वाटा या अभिनव उपक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर नांदेड येथील मुख्याध्यापक डॉ. अण्णा गरड हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश रवंदे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अण्णा गरड म्हणाले की, भूगोल विषयांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य संधी आहेत, त्या संधीचा शोध घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे. ते पुढे म्हणाले की, पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर भूगोल विषयाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश रवंदे म्हणाले की, भूगोल विषय हा मानवाच्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध असलेला विषय आहे. भूगोलाचा मानवी जीवनावर प्रभाव असतो व पर्यावरणाची जनजागृती करण्यासाठी,, पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी भूगोल विषयाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. भूगोल विभाग प्रमुख डॉ. नामदेव वाघमारे यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भूगोल विभागाद्वारे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी भूगोल विभागाद्वारे वसुंधरा या भितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. भूगोल अभ्यास मंडळाचा अध्यक्ष दीपक कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सूत्रसंचालन कुमारी सेजल गरगडे हिने केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ममता वाघमारे या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमासाठी भूगोल विभागाच्या प्रा. संध्या आढाव, डॉ. कविता बोधले, डॉ. अर्चना दुडे उपस्थित होत्या, तर महाविद्यालयातील डॉ. लक्ष्मण काळे, डॉ. हनुमंत भोपाळे, डॉ. केदार साळुंखे, डॉ. रंजना अडकिने, डॉ. पूनम शर्मा, डॉ. मंजुषा कोल्हे, प्रा. विद्या काकडे, संगीता जोंधळे व पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post Views: 74
