नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या पाच घटना; लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला


नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या पाच वेगवेगळ्या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

अर्धापूर तालुक्यातील देवल बुद्रुक येथे १ जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी एका घरात घुसून घरातील व्यक्तींना धाक दाखवत रोख ९ लाख रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून नेला. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माबाद तालुक्यातील चाळेखा शिवारात ३० जून रोजी झालेल्या वादातून एका व्यक्तीस मारहाण करून त्याच्या हातातील दोन चांदीच्या अंगठ्या जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हदगाव शहरातील वाजपेयी नगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच मुदखेड येथील एका रेस्टॉरंटचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश करत ९१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाणे करीत आहेत.

उमरी शहरातील आंबेडकर नगर येथेही बंद घराची खिडकी उघडून घरात प्रवेश करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी ४६ हजार २३७ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व घटनांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्व प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *