I am satisfied today because of my strong roles! | ठाम भूमिकांमुळेच मी आज तृप्त!: रोटरी मराठी साहित्य संमेलनात अमोल पालेकरांनी उलगडला जीवनप्रवास – Pune News



प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नुकतेच रोटरी मराठी साहित्य संमेलनात आपल्या आयुष्याविषयीच्या ठाम भूमिकांमुळे आज आपण तृप्त असल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या संमेलनात चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात त्यांची मुलाखत पार पडल

.

यावेळी बोलताना पालेकर म्हणाले की, ‘भाग्य’ या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात अभिनय करताना मी संवेदनशीलता आणि भावनात्मक मोकळेपणा जपला. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता, अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव आहे. नवेपणा स्वीकारण्याच्या इच्छेमुळेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या आणि त्यातूनही सच्चेपणाच मांडत गेलो.

आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे आणि कुठे बदल करायचे, याविषयी माझ्या ठाम भूमिका आहेत. त्यामुळेच आज मी जो आहे, तो तृप्त आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात उत्तरा मोने यांनी अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी संवाद साधला.

अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीलाही मिळेल, असा विश्वास मला होता, असे पालेकर यांनी नमूद केले. ज्यांना माझे विचार पटत नाहीत, त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही, असेही ते म्हणाले. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल, कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या पुणे कनेक्शनबद्दल बोलताना पालेकर म्हणाले, “मी मूळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणी जाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही.” गेली २५ वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे फारसे बदलले नाही असे मला जाणवते, त्यामुळे मी पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

माझ्यातील चित्रकार कुठल्याही ‘इझम’मध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावेसे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही.

चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली आणि यातूनच माझ्या हातून ‘ऐवज’सारखी साहित्यकृती निर्माण झाली, असेही पालेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *