हिंगोलीत टाकळगाव अपघातातील जखमीचा मृत्यू:मृतांची संख्या तीनवर, दोघांवर अद्यापही उपचार सुरु




वसमत ते नांदेड मार्गावर टाकळगाव शिवारात कार उलटून झालेल्या अपघातातील आणखी एका जखमीचा रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर अद्यापही अन्य दोन गंभीर रुग्णांवर नांदेड येथे उपचार सुरु आहेत.या प्रकरणात चालका विरुध्द वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 1 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील पाच जण त्यांच्या कारने लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी परभणी येथे गेले होते. ता. 26 फेब्रुवारी रोजी लग्न सोहळा आटोपून ते पाचही जण वसमत मार्गे नांदेडकडे निघाले होते. वसमत ते नांदेड मार्गावर टाकळगाव शिवारात भरधाव कारवरील चालक आशिष भास्करे यांचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन आदळली. या अपघातात आशिष भास्करे, नितेश खंदारे या दोघांचा वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर उर्वरीत तिघांवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल यामध्ये गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या आकाश ढोकणे (25, रा. विजयनगर, नांदेड) यांचा मृत्यू झाला आहे. या शिवाय अन्य दोघांवर नांदेड येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी सिध्दांत सांगवीकर यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय बोराटे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *